पीटीआय, नवी दिल्ली : संकटग्रस्त अदानी समूहाकडून मागील काही दिवसांपासून कर्जभार कमी करण्यासाठी प्रयत्न म्हणून काही हजार कोटींच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड एकीकडे सुरू असताना, समूहातील आघाडीच्या अदानी एंटरप्रायझेसच्या देणेकऱ्यांसाठी समूहातील अन्य कपंन्यांतील प्रवर्तकांच्या मालकीचे आणखी समभाग तारण ठेवण्यात आल्याची आश्चर्यकारक बाब गुरुवारी पुढे आली.
एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनीने भांडवली बाजाराला पत्र पाठवून ही गोष्ट उघडकीस आणली आहे. यानुसार, अदानी ग्रीन एनर्जी कंपनीतील प्रवर्तकांच्या मालकीचे ०.९९ टक्के समभाग हे अदानी एंटरप्रायझेसने कर्जदात्यांच्या फायद्यासाठी तारण ठेवण्यात आले. याचबरोबर अदानी ट्रान्समिशनमधील प्रवर्तकांचे अतिरिक्त ०.७६ टक्के समभागही बँकांकडे तारण ठेवण्यात आले आहेत.
स्टेट बँकेच्या मालकीची एसबीआयकॅप ही कंपनी आहे. अदानी एंटरप्रायझेसने तिच्यासाठी घेतलेल्या कर्जासाठी तारण समभागांचा तपशील या कंपनीने मात्र दिलेला नाही. अदानी समूहातील कंपन्यांचे आणखी समभाग तारण ठेवण्यात आल्यामुळे एसबीआयकॅपकडे अदानी ग्रीन एनर्जीमधील प्रवर्तकांच्या तारण समभागांची संख्या २ टक्क्यांवर पोहोचली आहे. याच वेळी अदानी ट्रान्समिशनच्या तारण समभागांची संख्या १.३२ टक्के झाली आहे.
अदानी समूहाने आतापर्यंत २.०१६ अब्ज डॉलरच्या कर्जाची परतफेड केल्याचे म्हटले होते. यामुळे समूहातील चार कंपन्यांतील प्रवर्तकांच्या मालकीचे तेवढ्या मूल्याचे समभाग तारणमुक्त झाल्याचा दावा कंपनीने केला होता. मात्र, अदानी समूहाने कर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे कोठून आले याचा तपशील दिला नव्हता. समूहातील चार कंपन्यांनी अमेरिकास्थित जीक्यूजी पार्टनर्स कंपनीला १५ हजार ४४६ कोटी रुपयांचा हिस्सा विकल्यानंतर काही दिवसांतच कर्जाची फेड करण्यात आली होती.
आधी फेड अन् २४ तासांत पुन्हा गहाण
अदानी समूहाने मंगळवारी ७ मार्चला, ७ हजार ३७४ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केल्याचे म्हटले होते. समूहातील चार कंपन्यांतील प्रवर्तकांचे समभाग तारण ठेवून हे कर्ज घेण्यात आले होते. कर्जाची परतफेड करून अदानी समूहाने हे समभाग तारणमुक्त केले होते. समूहातील कंपन्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे, यानंतर दुसऱ्याच दिवशी अदानी समूहाने पुन्हा प्रवर्तकांचे समभाग गहाण ठेवून कर्ज मिळविल्याची बाब उघडकीस आली आहे.