वृत्तसंस्था, नवी दिल्ली
प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत नजीक येऊन ठेपली असून, मुदतवाढ न देण्याबाबत अर्थमंत्रालयाने स्पष्ट संकेत पाहता आता त्यासाठी अवघे १२ दिवस शिल्लक राहिले आहेत. परिणामी विवरणपत्र दाखल करणाऱ्या करदात्यांचे प्रमाणही वाढत असून, मंगळवार, १८ जुलैपर्यंत ३ कोटींहून अधिक करदात्यांनी विवरणपत्र दाखल केली आहेत. यापैकी सुमारे ९१ टक्के करदात्यांनी त्यांनी दाखल केलेली विवरणपत्रे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सत्यापितही केली आहेत, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने बुधवारी दिली.
तीन कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याचा टप्पा मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ७ दिवस आधीच गाठला गेला आहे.
आणखी वाचा-भारताचा विकास दर ६.४ टक्के राहील- एडीबी
पगारदार करदात्यांना आणि ज्यांना त्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करणे आवश्यक नाही, अशा करदात्यांसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. गेले कैक वर्षे सुरू राहिलेल्या प्रथेप्रमाणे यंदा या मुदतीत वाढ होण्याची शक्यता अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुस्पष्टपणे फेटाळून लावली आहे. यंदा १८ जुलैपर्यंत दाखल केलेल्या ३.०६ कोटी विवरणपत्रांपैकी २.८१ कोटी विवरणपत्र ई-सत्यापित केली गेली आहेत. ई-सत्यापित करण्यात आलेल्या २.८१ कोटी विवरणपत्रांपैकी १.५० विवरणपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे.
मुदतीत विवरणपत्र भरण्याचे आवाहन
अंतिम मुदत जवळ आल्याने विवरणपत्रे भरण्यासाठी संकेतस्थळावर होणाऱ्या गर्दीमुळे करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. म्हणूनच शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी करदात्यांनी लवकर विवरणपत्र दाखल करण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.