रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात मोठे बदल करण्यात आले आहेत. आकाश, अनंत आणि ईशा अंबानी यांना या मंडळात नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. तसेच नीता अंबानी यांना बोर्डाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. मात्र, नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी कायम राहतील. बाजारमूल्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) सुरू झाली आहे. या बैठकीत रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या आयपीओबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.
गेल्या वर्षी आकाश अंबानी यांना भारतातील सर्वात मोठी मोबाइल कंपनी रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. मुकेश अंबानी अजूनही जिओचे चेअरमन आणि रिलायन्स जिओचे मालक आहेत. ईशा अंबानी रिलायन्स रिटेलच्या चेअरपर्सन आहेत आणि अनंत अंबानी एनर्जी बिझनेस सांभाळत आहेत.
रिलायन्सच्या एजीएममध्ये दिली महत्त्वाची माहिती
कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने गेल्या १० वर्षांत एकत्रितपणे १५० अब्ज डॉलर गुंतवणूक केली आहे. भारतीय कॉर्पोरेटने केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. रिलायन्स उदयोन्मुख नवीन भारताचा आश्रयदाता असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं आहे.
एजीएम म्हणजे काय?
एजीएम (वार्षिक सर्वसाधारण सभा) हा वार्षिक सभेचा एक प्रकार आहे. ही बैठक कंपनी आणि भागधारक यांच्यातील संवाद म्हणून केली जाते. या बैठकीत कंपनी आपली प्रगती, प्रकल्प आणि आव्हाने याविषयी गुंतवणूकदारांना माहिती देते. कंपनीने दरवर्षी भागधारकांसोबत बैठक घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.