मुंबई : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १,८६,४४० कोटी रुपये कराचा भरणा केला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ९ हजार कोटी अधिक आहे. २०२२-२३ मध्ये कंपनीने १,७७,१७३ कोटी रुपये कर भरणा केला होता, असे कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालातून बुधवारी स्पष्ट झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशांतर्गत भांडवली बाजारात २० लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडणारी एकमेव कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल गेल्या वर्षाच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वधारले आहे. तर जागतिक पटलावर सर्वाधिक बाजार भांडवल असणारी ती ४८ व्या क्रमांकाची कंपनी आहे. कंपनीचा एकत्रित महसूलदेखील सरलेल्या आर्थिक वर्षात १० लाख कोटींपुढे गेला आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीने ३ लाख कोटी रुपयांची निर्यात केली. तर याच कालावधीत १.३५ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक तिने वेगवेगळ्या व्यवसायांत केली.

हेही वाचा >>> ॲस्थेटिक इंजिनीयर्सचा ‘आयपीओ’ आजपासून खुला

नफ्याच्या आघाडीवरही कंपनीची कामगिरी सरस ठरली असून, तिने ७९ हजार कोटींचा करोत्तर नफा मिळवला आहे. मागील आर्थिक वर्षातील ७३,६७० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा निव्वळ नफा ७.३ टक्के अधिक राहिला आहे.

अंबानी ‘शून्य’ वेतनावर कार्यरत

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सलग चौथ्या वर्षी कंपनीकडून ‘शून्य’ वेतन घेतले आहे. याआधी २००८ ते २०२० पर्यंत त्यांनी वार्षिक १५ कोटी रुपये वेतन घेतले होते. मात्र करोनाच्या काळापासून त्यांनी कंपनीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी वेतन नाकारले. नवीनतम वार्षिक अहवालानुसार, पगार, भत्ते आणि अनुलाभ तसेच सेवानिवृत्ती लाभ म्हणून त्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एक रुपयाही मिळविलेला नाही. तथापि १०९ अब्ज डॉलरच्या मालमत्तेसह जगातील ११ वे श्रीमंत व्यक्ती असलेले अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाकडे रिलायन्सचे ३३२.२७ कोटी समभाग म्हणजेच ५०.३३ टक्के हिस्सेदारी आहे. परिणामी २०२३-२४ मध्ये लाभांशापोटी त्यांना ३,३२२.७ कोटी रुपये मिळविले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani s reliance company paid rs 1 86 lakh crore tax in financial year 2023 24 print eco news zws