मुंबई: अमेरिकी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्यापारकराच्या घोषणेआधी बुधवारच्या सत्रात भांडवली बाजारात तेजीचे वातावरण राहिले. मंगळवारच्या सत्रातील मोठ्या घसरणीनंतर मजबूत देशांतर्गत आकडेवारीने दिलेल्या स्फुरणांतून, बँकिंग आणि वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमधील खरेदीमुळे बुधवारी शेअर बाजार तेजीत राहिला.

सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५९२.९३ अंशांनी म्हणजेच ०.७८ टक्क्यांनी वधारून ७६,६१७.४४ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ६५५.८४ अंशांची कमाई करत त्याने ७६,६८०.३५ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १६६.६५ अंशांची वाढ (०.७२ टक्के) झाली आणि तो २३,३३२.३५ पातळीवर बंद झाला.

भारत-अमेरिका व्यापार वाटाघाटींमध्ये सकारात्मक प्रगती पाहता, ट्रम्पनीतीनुसार व्यापार कराच्या अंमलबजावणीचा देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर कमीत कमी परिणाम होईल या अपेक्षेमुळे हा आशावाद मुख्यत्वे प्रेरित होता. मार्चमध्ये आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचलेल्या भारताच्या निर्मिती क्षेत्राच्या ‘पीएमआय’ने भावनांना आणखी बळकटी दिली. याबरोबरच सरलेल्या मार्च तिमाहीत कंपन्यांचे आर्थिक निकाल सकारात्मक राहण्याचे संकेत मिळत आहेत, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये झोमॅटो सुमारे ५ टक्क्यांहून अधिक वधारला, त्यापाठोपाठ टायटन, इंडसइंड बँक, मारुती, टेक महिंद्र, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग तेजीसह बंद झाले. मात्र बुधवारच्या सत्रातील बाजार तेजीत नेस्ले, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह आणि लार्सन अँड टुब्रो यांची कामगिरी नकारात्मक राहिली.

सेन्सेक्स ७६,६१७.४४ ५९२.९३ ०.७८%

निफ्टी २३,३३२.३५ १६६.६५ ०.७२%

तेल ७४.४० ०.१२%

डॉलर ८५.५२ २ पैसे