लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : जागतिक बाजारपेठेतील कमकुवत कल आणि त्या परिणामी माहिती-तंत्रज्ञान, वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागातील विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्समध्ये बुधवारी तीन शतकी घसरण झाली, तर निफ्टी २५,००० खाली घसरला.

सलग दुसऱ्या दिवशी घसरण होत, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१८.७६ अंशांनी घसरून ८१,५०१.३६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ४६१.८६ गमावत ८१,३५८.२६ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८६.०५ अशांची घसरण झाली आणि तो २४,९७१.३० पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>>बक्षीस समभागावर विप्रोकडून गुरुवारी निर्णय

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपन्यांच्या महसुलात घट होण्याच्या भीतीमुळे बाजाराने नकारात्मक श्रेणीत प्रवेश केला. आगामी काळात कंपन्यांच्या मूल्यांकनाच्या शाश्वततेवरदेखील याचा परिणाम होण्याची भीती आहे. कमकुवत मागणी आणि उत्पादन खर्चातील अस्थिरतेमुळे आगामी तिमाहीतदेखील कंपन्यांची मंद गतीने वाढ अपेक्षित आहे. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत मिळकतीत वाढीचा दर अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांमध्ये महिंद्र अँड महिंद्र, इन्फोसिस, कोटक महिंद्र बँक, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, आयटीसी आणि टायटन या प्रमुख समभागांमध्ये घसरण झाली. मात्र या घसरणीतही एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स आणि स्टेट बँकेच्या समभागांनी चमकदार कामगिरी केली.

हेही वाचा >>>‘महाबँके’ला १,३२७ कोटींचा तिमाही नफा

ह्युंदाईमध्ये दुसऱ्या दिवशी ४२ टक्के भरणा

ह्युंदाई मोटर इंडियाच्या मंगळवारपासून खुल्या झालेल्या २७,८७० कोटींच्या महाकाय प्रारंभिक समभाग विक्रीने (आयपीओ) दुसऱ्या दिवशी ४२ टक्के भरणा पूर्ण केला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, कंपनीने विक्रीस उपलब्ध केलेल्या सुमारे ९.९७ कोटी समभागांपैकी, ४.१७ कोटी समभागांसाठी मागणी नोंदवली गेली. वैयक्तिक किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भागासाठी ३८ टक्के भरणा, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून २६ टक्के आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (क्यूआयबी) राखीव ठेवण्यात आलेल्या हिश्शात ५८ टक्के भरणा झाला आहे. कंपनीच्या समभागांसाठी बोली लावण्यासाठी १७ ऑक्टोबर हा अखेरचा दिवस आहे.

सेन्सेक्स ८१,५०१.३६ -३१८.७६ (०.३९%)

निफ्टी २४,९७१.३० -८६.०५ (०.३४%)

डॉलर ८४.०० -४

तेल ७४.३२ ०.०८%