मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीमध्ये निर्विवाद वर्चस्व कायम राखले असून, मुंबईकरांनी म्युच्युअल फंडामध्ये १७.८३ लाख कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. उल्लेखनीय म्हणजे तंत्रज्ञानाधारित नवनवे बदल अनुभवणाऱ्या या क्षेत्रात आजही मुंबईसह महाराष्ट्राचा एकूण म्युच्युअल फंड गंगाजळीत तब्बल २७.९ टक्क्यांसह सिंहाचा वाटा रूढ परंपरेने कायम असून, अन्य राज्यांच्या तुलनेत अंतरही रुंदावत चालले आहे.
हेही वाचा >>> Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर
ऑक्टोबर २०२४ अखेर म्युच्युअल फंडातील एकूण गंगाजळी ६७.२६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामध्ये एकट्या मुंबईचे २६.९२ टक्के योगदान राहिले आहे. त्याखालोखाल दुसऱ्या स्थानावर दिल्लीचा वाटा हा निम्म्याहून कमी १२.१५ टक्के आहे. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’च्या (अॅम्फी) आकडेवारीनुसार, व्यवस्थापनाखालील एकूण म्युच्युअल फंड मालमत्तेत ५६ टक्क्यांहून अधिक वाटा देशातील फक्त तीन राज्यांमधून येतो. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातचा समावेश आहे. त्यातही दिल्ली (५.५२ लाख कोटीं रु.), गुजरात (४.८२ लाख कोटी रु.) आणि कर्नाटक (४.७२ लाख कोटी रु.) या तुलनेत महाराष्ट्राची (२७.८९ लाख कोटी रु.) हिस्सेदारी कैकपटींनी अधिक आहे. डिसेंबर २०२३ अखेर दिल्ली आणि तिसऱ्या स्थानावर कर्नाटक यांचे योगदान अनुक्रमे ६.४४ लाख कोटी रुपये आणि २.७७ लाख कोटी रुपये असे होता, तर महाराष्ट्र तेव्हाही सुमारे १४ लाख कोटी रुपये मालमत्तेसह अग्रस्थानी होता, परंतु आता महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांची दरी रुंदावली आहे.
हेही वाचा >>> ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
महाराष्ट्रात म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा पुरेसा सर्वदूर विस्तारही दिसून येतो. फ्रँकलिन टेम्पल्टनच्या अहवालानुसार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या आघाडीच्या ७५ शहरांमध्ये महाराष्ट्रातील १५ शहरांचा समावेश आहे. यामध्ये नाशिक (२६,००० कोटी रु. – ०.३९ टक्के), कोल्हापूर (०.१४ टक्के), कल्याण (०.१० टक्के), मीरा रोड (०.०८ टक्के), पनवेल (०.०८ टक्के), सोलापूर (०.०८ टक्के), जळगाव (०.०७ टक्के), ठाणे (०.०७ टक्के), सांगली (०.०७ टक्के), अकोला (०.०५ टक्के), सातारा (०.०५ टक्के), धुळे (०.०५ टक्के) या शहरांचा समावेश आहे. तर देशपातळीवरील पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे. म्युच्युअल फंड उद्याोगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत पुण्याचे ३.९४ टक्के योगदान असून एकंदर २.६१ लाख कोटींच्या गुंतवणुकीसह ते राष्ट्रीय स्तरावर चौथ्या स्थानी आहे. तर नागपूर ०.५८ टक्के म्हणजेच ३८,००० कोटी रुपये योगदानासह आठव्या स्थानी आहे.