मुंबई : देशातील म्युच्युअल फंड घराण्यांनी ऑक्टोबरमध्ये १.८० लाख कोटी रुपयांची रोख ही गुंतवणूक न करता राखून ठेवली, जी त्यांच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या ५.०५ टक्के आहे. त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये रोखीचे प्रमाण १.८६ लाख कोटी रुपयांच्या घरात (एयूएमच्या ५.०२ टक्के) होते. भांडवली बाजारात पडझड सुरू असताना, गुंतवणूक करण्यापेक्षा प्रतीक्षा करण्याचे धोरण आघाडीच्या फंड घराण्यांनी अनुसरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात एकूण समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंडांची मालमत्ता (एयूएम) ३५.७२ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. भांडवली बाजारात एकीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) समभाग विक्रीचा सपाटा लावला असतानाही, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात १ लाख कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. तथापि प्रत्यक्षात म्युच्युअल फंडांनी २ लाख कोटी रुपयांचा निधी स्वतःकडे बाळगून ठेवल्याचे आकडेवारी दर्शविते.

हेही वाचा : सरकारी कंपन्यांच्या लाभांश, विभाजन, बक्षीस समभागासाठी नवीन दंडक

ऑक्टोबर २०२४ अखेर ४३ म्युच्युअल फंड घराण्यांपैकी, पाच आघाडीच्या म्युच्युअल फंडांनी प्रत्येकी १०,००० कोटींहून अधिक रोख गुंतवणुकीविना राखून ठेवली. एसबीआय म्युच्युअल फंडाकडे सर्वाधिक ३१,१२६ कोटी रुपयांची रोख आहे, जी त्यांच्या एकूण ६.६६ लाख कोटी रुपयांची इक्विटी मालमत्तेच्या (एयूएमच्या) तुलनेत ४.४६ टक्के आहे. त्यापाठोपाठ आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाकडे २७,२१७ कोटी रुपये रोखीत आहेत, जे त्याच्या एकूण एयूएमच्या ६.९० टक्के आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंडाकडे २२,७११ कोटी रुपये रोखीत आहेत, जे त्याच्या एकूण एयूएमच्या ६.१६ टक्के आहेत. ऑक्टोबर २०२४ पर्यंत, एचडीएफसी म्युच्युअल फंडाची इक्विटी मालमत्ता ३.४५ लाख कोटी रुपये आहे.

पीपीएफएएस म्युच्युअल फंडाकडे ऑक्टोबरमध्ये १७,११६ कोटी रुपये गुंतवणुकीविना रोखीत होते. हे प्रमाण त्याच्या एकूण समभागसंलग्न मालमत्तेच्या तब्बल १९.८६ टक्के इतके आहे. ॲक्सिस म्युच्युअल फंडाकडे १३,१०५ कोटी रुपये गुंतवणुकीविना होते, जे त्याच्या एकूण एयूएमच्या ६.७५ टक्के आहेत. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड आणि क्वांट म्युच्युअल फंड अनुक्रमे ८,६५६ कोटी रुपये आणि ८,२०० कोटी रुपये रोख बाळगून आहेत. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाकडे ३,२९७ कोटी रुपये रोख होते, जे ऑक्टोबरमधील एकूण एयूएमच्या सुमारे २.२० टक्के होते. मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाकडे ऑक्टोबरमध्ये रोख २,१८० कोटी रुपये होते, जे त्याच्या एकूण एयूएमच्या सुमारे ३.१२ टक्के होते. याच कालावधीत फंड हाऊसची इक्विटी एयूएम ६७,८१८ कोटी रुपये होती.

हेही वाचा : सात सत्रातील ‘निफ्टी’च्या घसरणीला लगाम, ‘सेन्सेक्स’ची २३९ अंशांची मुसंडी

रोख बाळगण्याचे कारण काय?

निधी व्यवस्थापकांना मालमत्तेचा काही भाग रोख स्वरूपात राखून ठेवण्याची मुभा आहे. गुंतवणूकदारांकडून युनिट्स विक्री (रिडम्प्शन) वाढल्यास, त्यासाठी आवश्यक निधीची पूर्तता जेणेकरून करता येते. तरी रोख बाळगण्याचे प्रमाण ५ टक्के वा त्याहून अधिक राहणे हे असामान्यच मानले जाईल. सेन्सेक्स-निफ्टीच्या तीव्र घसरणीच्या काळातही गुंतवणूकदारांकडून विक्री (रिडम्प्शन) तुलनेने नगण्य राहिले. उलट ऑक्टोबरमध्ये नक्त ४१,८६५ कोटी रुपयांचा विक्रमी ओघ इक्विटी फंडात दिसून आला, जो सप्टेंबरच्या तुलनेत २२ टक्क्यांनी अधिक होता. म्हणजे बाजारात संभाव्य खरेदीच्या संधी उपलब्ध नव्हत्या हेच फंड घराण्यांनी गुंतवणूक न करता, रोख बाळगण्याचे संभाव्य कारण दिसून येते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutual fund 2 lakh crores rupees cash not invested in stock market print eco news css