माझी शिफ्ट संपली आहे, आता मी निघतोय… तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये हे अनेकदा ऐकलं असेल… खरं तर अलीकडेच इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करायला हवं, असं सुचवलं होतं. आठवड्यातून ७० तास म्हणजे दिवसातून १० तास करावे, असं नारायण मूर्तींचं म्हणणं आहे. कामाची उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांनी हे सांगितले होते. नारायण मूर्ती यांच्या मते, भारताची कार्य उत्पादकता जगात सर्वात कमी आहे, ती वाढवण्याची गरज आहे. जपान आणि जर्मनीच्या धर्तीवर भारतातील तरुणांनीही असेच करावे, असे त्यांनी सुचवले होते. २१ वर्षीय अमेरिकन कॉलेज ग्रॅज्युएट ब्रिएल असेरो हिने TikTok वर तिच्या ९ ते ५ जॉबमधील शिफ्टबद्दल रडत सांगितले की, तिला नोकरीमुळे दुसरे काही करण्यासाठी वेळच मिळत नाही.
मेक्सिको (४१ तास), कोस्टा रिका (४६ तास) आणि कोलंबिया (३८) सारखे दिवसाला ८.५ तास कामाचे तास निश्चित केलेले देश आहेत. खरं तर अगदी जपान, स्पेन, आइसलँड आणि बेल्जियम यांसारख्या काही देशांनीही चार दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या धोरणावर काम सुरूच ठेवले आहे. या दरम्यान, तरुण कर्मचार्यांचा विचार करता यातून काही तरी मध्यम मार्ग काढण्याची गरज आहे. नारायण मूर्तींच्या आठवड्यातून ७० तास काम करण्याच्या विधानावर सोशल मीडियावरही चर्चा सुरू आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे मालक आणि कर्मचाऱ्यांनी या विषयावर मत व्यक्त केले. सध्या बहुतांश कार्यालयांमध्ये दिवसातून ८ ते ९ तासांच्या शिफ्ट असून, २ दिवस सुट्ट्या आहेत. नारायण मूर्ती यांच्या या विधानादरम्यान GenZ म्हणजेच नवीन पिढीतील तरुणांनी आपली मतं व्यक्त केली आहे. याविषयी नव्या पिढीतील लोकांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेणार आहोत.
हॅबिल्डचे सीईओ सौरभ बोथरा म्हणतात, “आजच्या जगात जिथे तंत्रज्ञान आणि रिमोट वर्क दिवसागणिक बदलत आहेत, तेथे उत्पादक होण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. हे फक्त १२ तास घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे काम करण्यासारखे नाही. हे कार्य कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे पूर्ण करणे महत्त्वाचे आहे,” बोथरा यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. तसेच बहुतेक जनरल झेड नोकरीदरम्यान नियमित ९ ते ५ अशा वेळेत काम करण्याला प्राधान्य देतात. “त्यामुळे त्यांनी कोणत्याटी अटींवर काम न करता आपले आयुष्य अन् स्वप्न कसे पूर्ण कराल या दृष्टिकोन ठेवून काम केले पाहिजे. कमी तास काम केल्यानं लोक आळशी असतात असं समजणे योग्य नाही, असं बोथरा म्हणाले.
हेही वाचाः दोन हजारांच्या नोटा जमा करायच्या आहेत? आता रांगेत ताटकळत उभं राहण्याची गरज नाही, वाचा सविस्तर
कार्यालयात काम करण्याबद्दल GenZ ला काय वाटते?
नव्या पिढीतील तरुणांना ऑफिसमध्ये ९ तासांपेक्षा जास्त वेळ घालवणे कदाचित आवडत नाही. त्यामुळे ९ तास संपताच ते घराकडे निघतात. असेच काहीसे इन्व्हेस्टमेंट बँकर रोहन कश्यप (नाव बदलले आहे)बरोबर घडले आहे. खरं तर रोहनच्या टीममध्ये बहुतेक नव्या पिढीचे तरुण काम करतात, त्यामुळे तो आता त्यांच्याबरोबर काम करून थकला आहे. अनेकदा त्यांनी मुलाखतींमध्ये ऐकले की, काही जणांना कंपनी किंवा नोकरीबद्दल तपशील वाचण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. ऑफिसमध्ये ९ तास काम केल्यानंतर ते इतके थकतात की त्यांना इतर कामांसाठी वेळच मिळत नाही. अशा परिस्थितीत नारायण मूर्ती यांच्या ७० तासांच्या कामाचा विचारही कोणी करू शकत नाही. फक्त ९ तास संपले की नोकरदार म्हणतात की, माझी शिफ्ट संपली आणि आता मी निघतोय…
सोशल मीडियावर GenZ चे मत
सोशल मीडियावर नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यावर एका यूजरने लिहिले आहे की, मी याच्याशी सहमत आहे, तुमच्या मालकासाठी ४० तास आणि स्वत:साठी ३० तास काम करा. दुसर्या युजर्सने लिहिले की, तो आठवड्यातून ७० तास काम करण्यास पूर्णपणे असहमत आहे. ७० तासांच्या कामकाजाच्या आठवड्यानुसार, आपण सर्वोत्तम देश होऊ, परंतु कोणत्या किमतीवर? आठवड्यातून ७० तास काम केल्यानंतर ती व्यक्ती काय साध्य करेल? चांगले आरोग्य? छान कुटुंब? चांगला साथीदार? आनंद? व्यक्ती काय साध्य करेल? असा प्रश्नही एका युजर्सने उपस्थित केला आहे.