Namita Thapar reaction on Hotmail co-founder Remark : उद्योजक नमिता थापर यांनी हॉटमेलचे सहसंस्थापक साबीर भाटिया यांनी भारतीय अभियंत्यांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. नमीता यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कडक शब्दात भाटिया यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भाटिया यांनी भारतीय अभियंत्यांबद्दल बोलताना एक विधान केले होते. “अभियंता म्हणून पदवी मिळवणारे ९९ टक्के भारतीय मॅनेजमेंटमध्ये जातात आणि सर्वांना ज्ञान देऊ लागतात,” असे विधान केले होते

याला उत्तर देताना नमिता थापर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याला सडेतोड उत्तर दिले आहे. भाटिया यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, “मी ८ वर्ष अमेरिकेत राहिले आहे आणि तेथे राहणार्‍या अनेक भारतीयांना भेटले ज्यांना भारतावर टीका करायला आवडते.” पुढे बोलताना शार्क टँक इंडिया या कार्यक्रमात जज म्हणून दिसणार्‍या थापर यांनी सरकारला ‘ब्रेन ड्रेन’च्या समस्येवर आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन देखील केले आहे. त्या म्हणाल्या की, “प्रिय सरकार, कृपया लक्षात घ्या की ब्रेन ड्रेन ही खरी समस्या आहे आणि त्यासाठी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.”

यानंतर त्यांनी साबीर भाटिया यांना देखील सुनावले आहे. ” भाटिया, कृपया लक्षात घ्या की दुसर्‍या देशात जाणे आणि ज्ञान देणे सोपे आहे पण खरा बदल आणि आव्हान हे तुमच्या देशात राहून बदल घडवून आणण्यात आहे!”

पॉडकास्टदरम्यान साबीर भाटिया यांनी बहुतेक भारतीय अभियंते अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर कोर अभियांत्रिकीमधील नोकर्‍यांपासून दूर पळतात आणि त्याऐवजी व्यवस्थापनाशी संबंधित नोकर्‍यांना प्राधान्य देतात असा दावा केला होता.

“भारताने त्याला कोणत्या क्षेत्रात स्पेशलाइज व्हायचे आहे याची निवड केली पाहिजे. भारत कोणत्याही गोष्टीत स्पेशलाइज होत नाहीये आणि स्वस्तातला जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बनत आहे,” असेही भाटिया म्हणाले होते.