इन्फोसिसचे सह संस्थापक नारायण मूर्ती आणि लेखिका अन् सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती गेल्या आठवड्यात आजी-आजोबा झाले आहेत. मुलगा रोहन मूर्ती आणि सून अपर्णा कृष्णन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. अक्षता मूर्ती यांच्या दोन मुलींनंतर नारायण-सुधा मूर्ती आता पुन्हा एकदा आजी-आजोबा झाले आहेत. बंगळुरूमध्ये १० नोव्हेंबरला मुलाचा जन्म झाला. एकाग्र या संस्कृत शब्दावरून बाळाचे नाव ठेवण्यात आले आहे. महाभारतातील अर्जुनाच्या एकाग्रतेचा कुटुंबावर खोलवर प्रभाव पडला होता, म्हणूनच या मुलाचे नाव यावरून प्रेरणेने ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
सहाव्या अध्यायातही नावाचा उल्लेख
एकाग्र हे नाव भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात देखील आढळते, ज्याचे संपूर्ण लक्ष योग आणि ध्यानावर आहे. शिवाय या शब्दाचा आत्म-भावनेशीही खोलवर संबंध आहे. ४० वर्षीय रोहन मूर्ती यांनी संगणक विज्ञान अभियंता म्हणून आपला प्रवास सुरू केला आणि आता ते एक यशस्वी उद्योजक बनले आहेत. ते Sorcoo चे संस्थापक आहेत, जी डेटा आधारित सॉफ्टवेअर फर्म आहे, जी डेटाला अर्थपूर्ण माहितीमध्ये रूपांतरित करते.
हेही वाचाः Money Mantra : …तर तुमचा UPI आयडी बंद होऊ शकतो, आजच करा ‘हे’ काम
लग्नानंतर चार वर्षांनी घरी पाळणा हलला
अपर्णा आणि रोहनचे २०१९ मध्ये लग्न झाले. बंगळुरूमध्ये झालेल्या या लग्नात फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. यामध्ये इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी, क्रिश गोपालकृष्णन, एसडी शिबुलाल आणि के. दिनेश आणि बायोकॉनचे प्रमुख किरण मुझुमदार शॉ उपस्थित होते.
नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांना आधीपासूनच कृष्णा आणि अनुष्का ही दोन लाडकी नातवंडं आहेत. या दोघी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुली आहेत. सुधा मूर्ती या दोन्हींचा अनेकदा उल्लेख करतात. त्यांनी नुकतीच लिहिलेली पुस्तकेही या दोन तरुणींना अर्पण केली आहेत.