इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी एक वक्तव्य केले होते. ज्यामुळे बराच वाद झाला. भारतीय तरुणांना त्यांनी आठवड्याला ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. ते स्वतः किती तास काम करायचे? याबद्दलचा खुलासा आता त्यांच्याकडून करण्यात आला आहे. इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मूर्ती यांनी त्यांच्या आयुष्यातील चढ-उतार आणि व्यावसायिक वाटचालीबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी सांगितले की, इन्फोसिसची स्थापना करताना ते तासनतास कामात गुंतलेले असायचे. “१९९४ पर्यंत मी आठवड्याला ८५ ते ९० तास काम करायचो”, असे ते या मुलाखतीत म्हटले.
“मी सकाळी ६.२० वाजता कार्यालयात जायचो आणि सायंकाळी उशीरा ८.३० वाजता बाहेर पडायचो. याप्रमाणे मी आठवड्यातले सहा दिवस काम करत होतो. तसेच आजे जे विकसित राष्ट्र आपल्याला दिसत आहेत, त्यांनीही अशाचप्रकारे कठोर मेहनत घेतलेली आहे”, असेही नारायण मूर्ती या मुलाखतीत म्हटले.
हे वाचा >> अग्रलेख: नारायण ‘वाक्बळी’!
ते पुढे म्हणाले, “माझ्या पालकांनी मला एक गोष्ट शिकवली होती. जर गरीबीतून बाहेर पडायचे असेल तर कठोर परिश्रम करण्यावाचून दुसरा पर्याय नाही. हा कानमंत्र मी आयुष्यभर लक्षात ठेवला. माझ्या ४० वर्षांहून अधिकच्या व्यावसायिक कारकिर्दीत मी आठवड्याला ७० हून अधिक तास काम केले आहे. तसेच १९९४ पर्यंत तर मी आठवड्याचे सहा दिवस काम करताना ८५ ते ९० तास पूर्ण करायचो. ते माझे काम वाया गेले नाही.”
याआधी ऑक्टोबर महिन्यात इन्फोसिसचे माजी अधिकारी मोहनदास पै यांच्याशी बातचीत करताना मूर्ती म्हणाले की, “भारताला जर चीन आणि जपान या वेगाने विकास साधत असलेल्या देशांशी स्पर्धा करायची असेल तर आपली उत्पादकता वाढवावी लागेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमधील लोक आठवड्याला अधिक तास काम करत होते. त्यामुळेच युद्धाच्या सावटातून ते लवकर बाहेर पडले. भारतीय तरुणांनी आपल्या देशासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी अशा प्रकारे परिश्रम उपसले पाहीजेत.”
ओलाचे सीईओ, भाविश अग्रवाल यांनी मूर्ती यांच्या मताशी सहमती दर्शविली आहे. कमी काम करून स्वतःचे मनोरंजन करण्याचा आमचा काळ नाही, त्यामुळे तरूणांनी अधिक काम करायला हवे. एक्स या सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये अग्रवाल यांनी म्हटले, मूर्ती यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. स्वतःचे मनोरंजन करून घेण्यात न गुंतता तरुणांनी पुढे येऊन पुढची एक पिढी घडवायला हवी. बाहेरच्या देशांनी याचप्रकारे पुढे येऊन अनेक पिढ्या घडविल्या आहेत.
कारखानदार साजन जिंदाल यांनीही मूर्ती यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. ते म्हणाले, भारतासारख्या विकासाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या देशाला पाच दिवसांच्या आठवड्याची गरज नाही.
असे असले तरी नारायण मूर्ती यांच्या दाव्याशी सर्वचजण सहमत नाहीत. चित्रपट दिग्दर्शक रॉनी स्क्रूवाला यांनी म्हटले की, अधिक तास काम केल्यानेच उत्पादकता वाढते, यात तथ्य नाही.
मूर्ती यांच्या विधानाचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. लोकसभेच्या तीन खासदारांनी नरेंद्र मोदी सरकारला याबाबत प्रश्न विचारला. इन्फोसिसच्या सह संस्थापक मूर्ती यांनी केलेले सूचनांचे सरकार मूल्यांकन करण्याचा विचार करणार का? असा प्रश्न उपस्थित केला गेला.
केंद्र सरकारचे मजूर आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, भारत सरकारसमोर अद्यापतरी असा कोणताही प्रस्ताव नाही.