मुंबई: कणखर, क्रांतिकारी आणि पोलादासारखा मजबूत भारत निर्माण करण्यासाठी एकत्र येण्याचे उद्योग क्षेत्राला उद्देशून आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईतील ‘इंडिया स्टील २०२५’ कार्यक्रमात दूरचित्र संदेशाद्वारे केले.पोलाद उद्योग हा आधुनिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशाला आवश्यक कच्चा माल सुरक्षित करण्यासाठी जागतिक भागीदारीला मजबूत करण्याची आवश्यकता आहे आणि पोलाद उत्पादन वाढवण्यासाठी वापरात नसलेल्या नवीन खाणींमधून लोहखनिज काढण्यास सुरुवात करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी उद्योगांना केले. आता या खाणी प्रभावीपणे वापरण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

पुढील दोन दिवसांत भारताच्या या पोलाद उद्योगातील संधी व क्षमतेवर चर्चा होईल. या कार्यक्रमाचे आयोजन गोरेगावस्थित नेस्को संकुलात करण्यात आले आहे. ‘इंडिया स्टील २०२५’ हे नवीन कल्पना, भागीदारी आणि नवोपक्रमांसाठी एक मजबूत मंच ठरेल. पोलाद क्षेत्रात नवीन पर्वाची तो मुहूर्तमेढ रोवेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.राष्ट्रीय पोलाद धोरणांतर्गत भारताने २०३० पर्यंत ३०० दशलक्ष टन स्टील उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या देशातील प्रतिव्यक्ती वापर सुमारे ९८ किलोग्रॅम असून, तो २०३० पर्यंत १६० किलोग्रॅमपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. मोदी म्हणाले की, वाढता स्टील वापर हा भारताच्या पायाभूत सुविधांचा आणि अर्थव्यवस्थेच्या सुवर्ण क्षणाचा मानदंड आहे, तसेच सरकारच्या कार्यक्षमतेचाही तो निर्देशक आहे.

पूर्वी भारत संरक्षण आणि धोरणात्मक क्षेत्रांसाठी लागणाऱ्या उच्च दर्जाच्या स्टीलसाठी आयातीवर अवलंबून होता, पण आज भारताने स्वतःच्या विमानवाहू नौकेसाठी लागणारे स्टील देशातच तयार केले, याचा उल्लेख करत मोदींनी गर्वाने चंद्रयान मोहिमेच्या यशातही भारतीय स्टीलचे योगदान असल्याचे सांगितले. उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या स्टीलसाठी हजारो कोटींचे प्रोत्साहन दिले गेले, असेही त्यांनी नमूद केले.