मुंबईः कॉसमॉस बँक आणि बंगळुरूस्थित नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक यांच्यातील ऐच्छिक विलीनीकरण पूर्णत्वाला गेले असून, नॅशनल बँकेच्या सर्व १३ शाखा रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीने कॉसमॉस बँकेच्या शाखा म्हणून सोमवार, ६ जानेवारीपासून ग्राहक सेवेत रुजू झाल्या. या १३ पैकी १२ शाखा बंगळुरूमध्ये तर एक शाखा म्हैसूर येथे आहे.
पूर्वाश्रमीच्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेतील सर्व ग्राहकांना आता कॉसमॉस बँकेच्या अत्याधुनिक सेवा-सुविधांचा लाभ मिळेल, असे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे म्हणाले. विलीन झालेल्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेचा एकत्रित व्यवसाय डिसेंबर २०२४ अखेर १,३२६ कोटी रुपये असा आहे. विलीनीकरणाने या बँकेच्या ठेवीदारांच्या जवळपास ७९२ कोटी रुपयांच्या ठेवींना संरक्षण मिळाले आहे. तर विलीनीकरणातून कॉसमॉस बँकेच्या कर्नाटक राज्यांतील शाखांची संख्या १७ वर गेली आहे.
हेही वाचा >>>Sensex Today: शेअर बाजारात पडझड, गुंतवणूकदार हवालदिल; १२०० अंकांनी सेन्सेक्स कोसळला!
बँकिंग क्षेत्रातील तीव्र स्पर्धेमुळे छोट्या सहकारी बँकांना कामकाज करणे अवघड होऊन बसले आहे. अशा समयी सहकाराचे तत्त्व जपत कॉसमॉस बँकेने गेल्या काही वर्षांत अडचणीत आलेल्या १९ लहान बँका विलीन करून घेतल्या आहेत आणि त्यायोगे त्या बँकांतील लाखो ठेवीदारांच्या पैशांचे संरक्षण केले आहे, असे काळे पुढे म्हणाले. कॉसमॉस बँकेने मार्च २०२४ अखेर एकूण ३५,४०० कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय करताना, ३५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. बँकेच्या देशभरात सात राज्यांमध्ये एकूण १८३ शाखा सध्या कार्यरत आहेत.