वृत्तसंस्था, नवी दिल्ली
राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) दाखल केलेल्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) प्रस्तावाची तपासणी अंतर्गत समितीकडून सुरू आहे, अशी भांडवली बाजार नियामक संस्था सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी दिली. लवकरात लवकर या प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीआयआयच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पांडे बोलत होते. ते म्हणाले की, सार्वजनिक हितापेक्षा व्यावसायिक हिताला जास्त महत्त्व देण्यास आम्ही परवानगी देणार नाही. नियामक म्हणून या सार्वजनिक हित जपण्यास आमचे प्राधान्य आहे. त्यांच्या हिताला बाधा येऊ नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.
एनएसईच्या आयपीओबाबत सेबीने आधी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यावर एनएसईने दिलेल्या उत्तरांची तपासणी सेबीच्या अंतर्गत समितीकडून सुरू आहे. एनएसईने २८ मार्चला सेबीकडे आयपीओच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल करण्यासाठी एनएसईला ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.
सेबीने याआधी एनएसईला व्यवस्थापनातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची सूचना केली होती. याचबरोबर एनएसई क्लीअरिंगमधील हिस्सा कमी करण्याचे निर्देशही सेबीने एनएसईला दिले होते. एनएसई क्लीअरिंग ही एनएसईची १०० टक्के मालकीची उपकंपनी आहे. तसेच, शेअर बाजारातील तांत्रिक अडथळ्यांवर उपाययोजना करण्यासह को-लोकेशन प्रकरणातील कायदेशीर प्रकरणांचा निपटारा होण्याची प्रतीक्षा करावी, असेही सेबीने एनएसईला सांगितले होते.
प्रस्ताव आठ वर्षे प्रलंबित
एनएसईच्या आयपीओचा प्रस्ताव गेल्या आठ वर्षांपासून सेबीकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. एनएसईने याच वर्षी सेबीकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे. सेबीने या प्रकरणी अंतर्गत समिती नेमली आहे. याचबरोबर सेबीने एनएसईला अनेक निर्देश दिले असून, त्यांची पूर्तता करण्यास सांगितले आहे.