मुंबई : देशाच्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी किरकोळ इंधन विक्रेता नायरा एनर्जीने समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेची घोषणा केली आहे. या माध्यमातून सुमारे २.५९ कोटी समभाग प्रत्येकी ७३१ रुपयांना खरेदी केले जाणार आहेत. पूर्वी एस्सार ऑइल म्हणून नायरा एनर्जी ही कंपनी ओळखली जात होती. एस्सार ऑइल ही त्यावेळी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध होती.
मात्र १७ फेब्रुवारी २०१६ पासून तिने तिचे समभाग दोन्ही बाजार मंचावरून स्वेच्छेने असूचिबद्ध (डीलिस्ट) करण्याचा निर्णय घेतला. बायबॅक हा भागधारकांना उत्पन्न परत करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. नायरा एनर्जीच्या संचालक मंडळाने किरकोळ गुंतणूकदारांना बाहेर पडण्याची संधी प्रदान केली असून यासाठी प्रति समभाग ७३१ रुपये किंमत निश्चित केली आहे.
याआधी फेब्रुवारी २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या एक वर्षाच्या कालावधीत रिव्हर्स बुक बिल्डिंगद्वारे भागधारकांकडून समभाग खरेदी करून त्यांना गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा मार्ग कंपनीने खुला केला होता. मात्र यात भाग न घेतलेल्या २ लाखांहून अधिक किरकोळ भागधारकांसाठी आता नव्याने संधी देऊ करण्यात आली आहे.