वृत्तसंस्था, बंगळूरु

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साखळी चहापानगृहे ‘कॅफे कॉफी डे’ची पालक कंपनी कॉफी डे ग्लोबलच्या दिवाळखोरी प्रक्रियेला राष्ट्रीय कंपनी कायदा न्याधिकरणाच्या (एनसीएलटी) बंगळुरू खंडपीठाने सोमवारी मंजुरी दिली. करोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सुरू टाळेबंदीतून बसलेल्या आर्थिक आघातातून कंपनी सावरता न आल्याचेच यातून स्पष्ट होते.

इंडसइंड बँकेने याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायाधिकरणाने सोमवारी तोंडी आदेश दिला आहे. या बाबतचा सविस्तर आदेश वृत्तसंस्थेच्या हाती अद्याप आलेला नाही. कॉफी डे एंटरप्रायजेस या सूचिबद्ध कंपनीची कॉफी डे ग्लोबल ही उपकंपनी आहे. कंपनीच्या डोक्यावरील इंडसइंड बँकेचे कर्ज ३१ मार्च २०२२ अखेरीस ६७.३ कोटी रुपये होते. कंपनीवरील वाढत्या कर्जभाराच्या धसक्याने, जून २०१९ मध्ये तिचे संस्थापक प्रवर्तक व्ही.जी. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तो धक्का ताजा असताना, मार्च २०२० पासून सुरू झालेल्या करोना टाळेबंदीने कंपनीवरील संकटाला आणखी गहिरे रूप प्रदान केले.

हेही वाचा – देशात १.२३ कोटींहून अधिक प्रवाशांचा उड्डाण योजनेअंतर्गत विमानांमधून प्रवास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडसइंड बँक आणि कंपनी यांच्यात तडजोड होऊ शकली नाही. त्यामुळे न्यायाधिकरणाने याप्रकरणी दिवाळखोरी प्रक्रियेला मंजुरी दिली. कॉफी डे ग्लोबलच्या वार्षिक ताळेबंदानुसार, कंपनीची १५८ शहरांत ४९५ कॅफे कॉफी डे उपाहारगृहे कार्यरत आहेत. याचबरोबर अनेक कंपन्या आणि हॉटेलांमध्ये तिची एकूूण ३८ हजार ८१० कॉफी व्हेंडिंग यंत्रे आहेत. कंपनीच्या डोक्यावरील एकूण कर्जभार मार्च २०२२ अखेरीस ९६० कोटी रुपये होते.

हेही वाचा – ६.५ कोटी EPFO सदस्यांसाठी खुशखबर! लवकरच पीएफ खात्यावर जमा होणार ८.१५ टक्के व्याजदर

सेबीनेही केली होती कारवाई

भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीने कॉफी डे एंटरप्रायजेस कंपनीला यावर्षी जून महिन्यात २६ कोटी रुपयांचा दंड केला होता. उपकंपन्यांतील निधी प्रवर्तकांशी निगडित कंपन्यांमध्ये वळविल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला होता. कॉफी डे एंटरप्रायजेसच्या सात उपकंपन्यांतील ३,५३५ कोटी रुपये प्रवर्तकांशी निगडित म्हैसूर अमलगमाटेड कॉफी इस्टेट या कंपनीत वळविण्यात आले होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nclt approves petition in coffee day global bankruptcy print eco news ssb