मुंबई: ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी गावातील विकास सहकारी सोसायट्या सक्षम करणे गरजेचे आहे. यासाठी विकास सोसायटी ते जिल्हा बँक ही साखळी मजबूत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
जिह्यातील सहकाराचे सर्व आर्थिक व्यवहार सहकारी जिल्हा बँकेतूनच करावेत असे आवाहनही मोहोळ यांनी केले. राज्यातील शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बँकेची सहकार गॅलरी, बँकेचे नवे बोधचिन्ह, नवा ध्वज आणि बँकेच्या सहकार गीताचे अनावरण करण्यात आले.
हेही वाचा >>>Satya Nadella: मायक्रोसॉफ्ट भारतात AI मध्ये ३ अब्ज डॉलर्सची करणार गुंतवणूक; सत्या नाडेलांची मोठी घोषणा!
अमित शहा यांनी केंद्रीय सहकार मंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यावर प्रत्येक अडचणीच्या विषयावर समन्वयाची भूमिका घेतली आहे. अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून शहरी सहकारी बँकांसाठीही त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल. केंद्र राज्य समन्वयातून राज्यातील सहकाराच्या अडचणींवर मार्ग निघेल असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला. ग्रामीण विकास सेवा सोसायटी आता औषधालय पेट्रोल पंपही चालवू शकतील. या सोसायटी सक्षम झाल्या तरच शेतकरी गाव आणि जिल्हा सक्षम होईल. यातील काही संस्थांचे काम पारदर्शक नाही, त्यामुळे या सोसायटीचे संगणकीकरण सुरू आहे. त्यामुळे व्यवहार पारदर्शक, सुरळीत आणि सोपे होतील, असेही त्यांनी दाखवून दिले.लवकरच देशात सहकाराचे प्रशिक्षण देण्यासाठी सहकार विद्यापीठ सुरू होईल. येत्या संसद अधिवेशनात त्या संदर्भातील विधेयक संमत होईल, असेही मोहोळ यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सहकाराच्या प्रश्नांवर मंत्रालय पातळीवर चर्चा होईल. आपण एकत्र येऊन राज्यातला सहकार सशक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, शिवाजी कर्डिले, जयंत पाटील, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर उपस्थित होते.