देशात मॅगीची विक्री करणाऱ्या नेस्ले या कंपनीने भारतात दुसऱ्या तिमाहीत ९०० कोटी रुपयांहून अधिक नफा कमावला आहे. कॉफी आणि चॉकलेट व्यतिरिक्त नेस्ले भारतात इतर अनेक उत्पादने विकते. आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत यावेळी नफ्यात ३७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली असून, ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीच्या शेअर्सने ५२ आठवड्यांचा विक्रमी उच्चांक गाठला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नफ्यात ३७ टक्के वाढ

मॅगी आणि कॉफी यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंचे निर्माते असलेल्या नेस्ले इंडिया लिमिटेडचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत ३७.२८ टक्क्यांनी वाढून ९०८.०८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा ६६१.४६ कोटी रुपये होता.

विक्रीतही वाढ

नेस्ले इंडिया लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, तिसऱ्या तिमाहीत निव्वळ विक्री ९.४३ टक्क्यांनी वाढून ५००९.५२ कोटी रुपये झाली, तर गेल्या वर्षी याच कालावधीत ती ४५७७.४४ कोटी रुपये होती. जुलै-सप्टेंबर तिमाहीत एकूण खर्च ५.९२ टक्क्यांनी वाढून ३९५४.४९ कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षी याच कालावधीत ३७३३.१२ कोटी रुपये होता.

हेही वाचाः Money Mantra : केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढला, पगार अन् पेन्शन किती वाढणार? गणित समजून घ्या

निर्यातीत घट

नेस्ले इंडियाची देशांतर्गत विक्री २०२२ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत ४३७१.९९ कोटी रुपयांवरून १०.३३ टक्क्यांनी वाढून ४८२३.७२ कोटी रुपये झाली आहे. कंपनीची निर्यात ९.५६ टक्क्यांनी घसरून १८५.८० कोटी रुपयांवर आली आहे, जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीत २०५.४५ कोटी रुपये होती. जुलै-सप्टेंबर तिमाहीत परिचालन उत्पन्न ९.४५ टक्क्यांनी वाढून ५०३६.८२ कोटी रुपये झाले.

हेही वाचाः Nokia Layoffs : दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी नोकिया आता करणार नोकर कपात, १४ हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार जाणार

कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ

तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. BSE कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, तो ३.३९ टक्क्यांनी म्हणजेच ७८९.२५ रुपयांच्या वाढीसह २४०५८.९० रुपयांवर बंद झाला. आज कंपनीचे शेअर्स बुधवारच्या तुलनेत स्थिर पातळीवर उघडले आणि ट्रेडिंग सत्रादरम्यान ते २४,२२८.७५ रुपयांवर पोहोचले, जो ५२ आठवड्यांचा उच्चांक देखील आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nestle india maggi manufacturing company earned rs 900 crore huge profit in 3 months vrd
Show comments