नवी दिल्ली : सरलेल्या २०२२-२३ आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करांपोटी एकूण १९.६८ लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले, जे आधीच्या वर्षातील १६.३६ लाख कोटी रुपयांच्या एकूण संकलनाच्या तुलनेत २०.३३ टक्क्यांनी वाढले. तर परतावा (रिफंड) म्हणून करदात्यांनी दिली गेलेली रक्कम वगळल्यास, प्रत्यक्ष करांचे नक्त संकलन १८ टक्क्यांनी वाढून १६.६१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे, असे सोमवारी सायंकाळी अर्थमंत्रालयाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा >>> ChatGpt : ‘त्या’ व्यक्तीने ChatGPT कडे केली पैशांची मागणी, एका मिनिटात खात्यावर १७ हजार जमा! नेमकं प्रकरण काय?
आधीच्या म्हणजे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये परतावा वजा जाता प्रत्यक्ष करांचे नक्त संकलन हे १४.१२ लाख कोटी रुपये होते. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष कर महसुलासाठी १४.२० लाख कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते आणि नंतर पुढे त्यासंबंधी १६.५० लाख कोटी रुपयांचा सुधारित अंदाज निश्चित करण्यात आला. प्रत्यक्षात यंदा प्राप्त तात्पुरती आकडेवारी दर्शविते की, प्रत्यक्ष करांचे नक्त संकलन हे सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षाही जास्त १६.६१ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनामध्ये व्यक्तिगत प्राप्तिकर आणि कंपनी कराचा समावेश होतो. या दोन्ही प्रकारच्या करदात्यांना २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी ३.०७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परतावा (रिफंड) म्हणून वितरित करण्यात आली आहे.