मुंबईः देशातील सर्वात मोठे फंड घराणे असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाने परिणामात्मक गुंतवणूक शैलीवर बेतलेली ‘एसबीआय क्वांट फंड’ ही नवीन योजना मंगळवारी दाखल केली. ४ डिसेंबर ते १८ डिसेंबर यादरम्यान खुल्या राहणाऱ्या नवीन फंड प्रस्तावाद्वारे (एनएफओ) ४,००० ते ५,००० कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून गोळा करण्याचे फंड घराण्याचे लक्ष्य आहे.
हेही वाचा >>> सर्वाधिक जीएसटी महसूल १८ टक्के करटप्प्यातून
नवीन फंडातून ८० ते १०० टक्के गुंतवणूक ही समभाग आणि समभागसंलग्न साधनांमध्ये केली जाईल. विविध बाजार चक्र आणि आवर्तनांमध्ये, मू्ल्य, भाव गती, गुणवत्ता आणि वृद्धी अशा विविध घटकांवर बेतलेल्या बहुघटक परिणात्मक प्रारूपातून या योजनेसाठी समभागांची निवड केली जाईल. ज्यायोगे गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्यासह, जोखीम-संयोजित सरस परतावा मिळविण्याची संधी मिळेल, असा विश्वास या नवीन योजनेच्या अनावरणप्रसंगी एसबीआय म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी नंद किशोर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> उत्पादन क्षेत्राची वाढ ११ महिन्यांच्या नीचांकी; किंमतवाढीच्या दबावाने घटलेल्या कार्यादेशांचा फटका
एसबीआय क्वांट फंडासाठी ‘बीएसई २०० टीआरआय’ हा मानंदड निर्देशांक असेल. सुकन्या घोष या त्याच्या निधी व्यवस्थापक, तर विदेशातील गुंतवणुकीसाठी प्रदीप केशवन हे समर्पित निधी व्यवस्थापक असतील. किमान ५,००० रुपये आणि त्यापुढे १ रुपयांच्या पटीत योजनेत गुंतवणूक करता येईल.