जनतेवर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा जोरदार प्रभाव दिसून आला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या ९ वर्षांत विक्रमी १७ कोटी ग्राहकांनी नवीन एलपीजी कनेक्शन घेतले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येमुळे एलपीजी ग्राहकांची संख्या दुप्पट होऊन ३१.२६ कोटी झाली आहे. एप्रिल २०१४ मध्ये सक्रिय एलपीजी ग्राहक १४.५२ कोटी होते, ते आता ३१.२६ कोटी झाले आहेत.
पीएम उज्ज्वला योजनेतून नवी क्रांती
नवीन एलपीजी कनेक्शनमध्ये झपाट्याने होणारी वाढ ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) मुळे आहे. एलपीजी कव्हरेज २०१६ मध्ये केवळ ६२ टक्के होते, जे गेल्या वर्षी २०२२ मध्ये १०४.१ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. एक काळ असा होता जेव्हा नवीन एलपीजी कनेक्शन मिळविण्यासाठी आणि रीफिल सिलिंडरची डिलिव्हरी मिळण्यासाठी ७-१० दिवस लागायचे, परंतु आता एलपीजी कनेक्शन मागणीनुसार उपलब्ध आहेत आणि ग्राहक बहुतेक ठिकाणी २४ तासांच्या आत रिफिल डिलिव्हरीचा लाभ घेऊ शकतात. आकडेवारीनुसार, ३० जानेवारी २०२३ पर्यंत PMUY अंतर्गत जारी केलेल्या एकूण कनेक्शनची संख्या ९.५८ कोटी आहे. गेल्या महिन्यात २४ मार्च २०२३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने PMUY लाभार्थ्यांसाठी प्रति वर्ष १२ रिफिलसाठी प्रति १४.२ किलो सिलिंडरसाठी २०० रुपये सबसिडी मंजूर केली.
हेही वाचाः देशातील आघाडीची आयटी कंपनी आता विकणार पीठ, तांदूळ, डाळ; अंबानी-अदाणींच्या कंपन्यांशी स्पर्धा करणार
काय आहे पीएम उज्ज्वला योजना?
पीएम उज्ज्वला योजना ०१ मे २०१६ रोजी लाँच करण्यात आली होती, ज्याचा उद्देश प्रत्येक गरीब कुटुंबाला मोफत LPG कनेक्शन देण्याचा होता. स्वयंपाकघर लाकूड आणि इतर धुरकट इंधन जाळून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत होते, तसेच मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने PMUY लाँच करण्यात आली. या योजनेंतर्गत सरकार पात्र कुटुंबांना प्रति कनेक्शन १,६०० रुपयांची आर्थिक मदत आणि प्रथमच मोफत LPG रिफिल आणि गॅस स्टोव्हसह मोफत LPG कनेक्शन देते.
हेही वाचाः २०२५ पर्यंत १२१ विमानतळं कार्बन न्यूट्रल होणार, ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला ‘हा’ मास्टर प्लॅन
सुरुवातीचे उद्दिष्ट गाठल्यानंतर योजनेचा विस्तार केला
PMUY चे सुरुवातीचे लक्ष्य ५ कोटी BPL कुटुंबातील महिला सदस्यांना LPG कनेक्शन देणे हे होते. हे लक्ष्य गाठल्यानंतर या योजनेचे लक्ष्य ८ कोटी एलपीजी कनेक्शनपर्यंत वाढवण्यात आले. उज्ज्वला २.०अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण भारत आधारावर अतिरिक्त एक कोटी एलपीजी कनेक्शन देण्याची प्रक्रिया १० ऑगस्ट २०२१ रोजी सुरू करण्यात आली.