मुंबई : खासगी सामान्य विमा क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीने नावीन्यपूर्ण कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यावर चालणाऱ्या प्रवास विमा योजना ‘ट्रीपसिक्युअर प्लस’चे शुक्रवारी अनावरण केले. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी या योजनेत अनेक नव्या वैशिष्ट्यांच्या अंतर्भावासह परिपूर्ण विम्याचे कवच प्रदान करण्यात आले आहे. प्रवास विमा सुलभ करून आणि तो अधिक सानुकूल आणि सहजसाध्य बनविण्याच्या उद्देशाने आयसीआयसीआय लोम्बार्डने ‘ट्रीपसिक्युअर प्लस’ योजना आणली आहे.
हेही वाचा >>> ‘मुद्रा’ कर्जांची मर्यादा दुपटीने वाढून २० लाखांवर
प्रवासादरम्यान सुरक्षितता आणि मनःशांती वाढवण्यासाठी विकसित केलेली अनेक अद्वितीय वैशिष्ट्ये ‘ट्रीपसिक्युअर प्लस’ प्रदान करते. व्हिसा नाकारल्यामुळे नियोजित सहल रद्द झाल्यास व्हिसा अर्जांसाठी भरलेल्या रकमेची भरपाई ते प्रवाशांनी विदेशांत भाड्याने घेतलेले वाहन खराब झाल्यास किंवा ते चोरीला गेल्यास राखलेल्या अनामत ठेवीची परतफेड योजनेतून केली जाते. साहसी पर्यटनप्रेमींसाठी, योजनेमध्ये साहसी खेळांतून संभवणाऱ्या जोखमीबाबत संरक्षण समाविष्ट आहे. यातून झालेल्या दुखापतींसाठी अथवा प्रवासादरम्यान अपघाताच्या परिस्थितीत कराव्या लागलेल्या वैद्यकीय खर्चाच्या भरपाईदेखील प्रदान केली जाते, ज्यात आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोगांसाठी कवचाचाही समावेश आहे.