लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : निर्देशांकातील वजनदार कंपन्या असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सीमधील खरेदीसह जागतिक बाजारपेठेतील तेजीचा मागोवा घेत निर्देशांकांनी शुक्रवारी उसळी घेतली. निफ्टीने दिवसभरातील सत्रात २२,१२६ या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला.

सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४४०.३३ अंशांनी वधारून ७२,०८५.६३ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,४४४.१ अंशांची उसळी घेत ७३,०८९.४० या सत्रातील उच्चांकी पातळीवर पोहोचला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १५६.३५ अंशांची भर घातली आणि तो २१,८५३.८० पातळीवर बंद झाला. त्याने सत्रात ४२९.३५ अंशांची कमाई करत २२,१२६.८० अंशांची सर्वोच्च पातळी गाठली.

हेही वाचा >>>दिल्ली एअरपोर्ट विमानसेवा नाही, तर मॉलमधून कमावतंय जास्त उत्पन्न

सेन्सेक्समध्ये पॉवर ग्रिड, एनटीपीसी, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, इन्फोसिस, टेक महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बजाज फायनान्स यांचे समभाग सर्वाधिक तेजी दर्शवित होते. तर ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, लार्सन अँड टुब्रो आणि आयटीसीच्या समभागात घसरण झाली.

एफपीआयकडून २५ हजार कोटी मूल्याच्या समभागांची विक्री

परदेशी गुंतवणूकदारांनी जानेवारी महिन्यात सुमारे ३.१ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे २५,००० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती ब्लूमबर्गने संकलित केलेल्या आकडेवारीवरून समोर आली. वर्ष २०२३ मध्ये, जागतिक गुंतवणूकदार संस्थानी देशांतर्गत भांडवली बाजारात २१.४ अब्ज डॉलरची (१.७५ लाख कोटी) गुंतवणूक केली. सरलेल्या वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांत त्यापैकी ४० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक केली. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने वर्षभरात १९ टक्क्यांची वाढ नोंदवली.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nifty close at the highest points of 22126 in stock market print eco news amy
Show comments