लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : माहिती तंत्रज्ञान आणि निवडक बँकांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा केल्याने प्रमुख निर्देशांक शुक्रवारच्या अस्थिर किरकोळ घसरणीसह स्थिरावले. मात्र निफ्टीने सर्वोच्च पातळीला स्पर्श केला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५.४४ अंशांनी वधारून ७३,१४२.८० अंशांवर बंद झाला. दिवसभरात त्याने ७३,४१३.९३ अंशांची उच्चांकी तर च्या ७३,०२२ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४.७५ अंशांची किरकोळ घसरण झाली आणि तो २२,२१२.७० पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात निफ्टीने शुक्रवारच्या सत्रात २२,२९७.५० या विक्रमी उच्चांकी पातळीला स्पर्श केला.
“जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे निफ्टीने आणखी एक विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर देशांतर्गत बाजारात दुपारच्या सत्रात किरकोळ घसरण झाली. परिणामी सकाळच्या सत्रातील तेजीचा वेग टिकवून ठेवण्यात बाजार अयशस्वी ठरला. नफावसुलीमुळे बाजार नकारात्मक पातळीवर विसावला,” असे मत जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समध्ये एचसीएलटेक, एशियन पेंट्स, मारुती, जेएसडब्ल्यू स्टील, टीसीएस, एसबीआय, आयटीसी आणि भारती एअरटेल या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. दुसरीकडे, बजाज फिनसर्व्ह, महिंद्र अँड महिंद्र, टायटन, एल अँड टी आणि विप्रो यांचे समभाग तेजीत होते.