Zerodhaचे सह संस्थापक निखिल कामतसुद्धा आता २०१० मध्ये वॉरन बफेट, मेलिंडा गेट्स आणि बिल गेट्स यांनी स्थापन केलेल्या द गिव्हिंग प्लेजमध्ये सामील झाले आहेत, जिथे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबे आणि व्यक्ती समाजाच्या भल्यासाठी त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा दान करण्याचे वचन देतात. अझीम प्रेमजी, किरण मुझुमदार-शॉ आणि रोहिणी, नंदन नीलेकणी यांच्यानंतर या यादीत समाविष्ट होणारा निखिल कामत हा चौथा भारतीय व्यक्ती आहे.
तरुण वय असूनही जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते वचनबद्ध आहेत आणि अधिक न्याय्य समाज निर्माण करण्याचे फाऊंडेशनचे ध्येय त्यांच्या स्वत:च्या मूल्ये आणि आकांक्षांशी सुसंगत असल्याचा विश्वासही निखिल कामत यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचाः मोदी सरकार आता ‘या’ कंपनीचा हिस्सा विकणार; ३८ हजार कोटींचा निधी जमवणार
निखिल वयाच्या १७ व्या वर्षापासून काम करतायत
निखिल कामत यांनी वयाच्या १७ व्या वर्षी पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांचा अनुभव मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराभोवती फिरला. त्यांनी या क्षेत्रात १८-१९ वर्षे घालवली आहेत. त्यांचे कौशल्य बहुतेक गुंतवणुकीमध्ये आहे आणि ते आपला बहुतेक वेळ सार्वजनिक आणि खासगी दोन्ही बाजारांमध्ये गुंतवण्यात घालवतात. त्यांनी २०१० मध्ये झेरोधाची स्थापना केली. आज झिरोधा ही १६,५०० कोटी रुपयांचं भागभांडवल असलेली कंपनी आहे. निखिल कामतने गेल्या वर्षीच्या हुरुन इंडिया सेल्फ-मेड रिच लिस्टमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. यादीनुसार, निखिल कामतची एकूण संपत्ती १७,५०० कोटी रुपये आहे. या आर्थिक वर्षात कंपनीने २०९४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
२४१ जण The Giving Pledge चा भाग बनले
द गिव्हिंग प्लेजमध्ये २९ देशांतील २४१ परोपकारी व्यक्ती आहेत. लोकांना अधिक दान देण्यास प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या देणगी योजनांचं व्यवस्थित नियोजन करणे हा यामागचा उद्देश आहे. जून २०२२ मध्ये झालेल्या शेवटच्या बैठकीपासून कामत व्यतिरिक्त द गिव्हिंग प्लेजने रॅव्हनेल बी यांचाही समावेश केला. तसेच करी III (युनायटेड स्टेट्स), बेनोइट डेझविले आणि मेरी-फ्लोरेन्स डेझविले (फ्रान्स, युनायटेड स्टेट्स), मायकेल क्रॅस्नी (युनायटेड स्टेट्स), टॉम आणि थेरेसा, प्रेस्टन-वर्नर (युनायटेड स्टेट्स), डेनिस ट्रॉपर आणि सुसान वोजिकी (युनायटेड स्टेट्स), आणि अँड्र्यू विल्किन्सन आणि झो पीटरसन (कॅनडा) यांचाही यात समावेश करण्यात आला आहे.