डिस्काउंट ब्रोकिंग कंपनी झिरोधाचे सह संस्थापक निखिल कामत यांची गणना देशातील सर्वात तरुण अब्जाधीशांमध्ये केली जाते. यंदा त्यांनी आपल्या नावात आणखी एक मोठी कामगिरी जोडली, जेव्हा त्यांनी जूनमध्ये आपली जवळजवळ अर्धी संपत्ती दान करण्याची घोषणा केली. आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा दान करून वॉरन बफे आणि बिल गेट्स यांसारख्या श्रीमंतांच्या यादीत सामील झालेल्या निखिलने आता असा निर्णय का घेतला याचे कारण सांगितले आहे.
द गिव्हिंग प्लेजमध्ये सामील होणारे कामत चौथे भारतीय
निखिल कामत वॉरेन बफे, मेलिंडा फ्रेंच गेट्स आणि बिल गेट्स यांनी २०१० मध्ये स्थापन केलेल्या गिव्हिंग प्लेजमध्ये सामील झाले आहेत. या मोहिमेत सामील होणारे अब्जाधीश आपली बहुतांश संपत्ती सामाजिक कल्याणासाठी दान करतात. कामत यांच्या आधी अझीम प्रेमजी, किरण मुझुमदार-शॉ आणि रोहिणी आणि नंदन निलेकणी यांसारखे भारतीय अब्जाधीशही द गिव्हिंग प्लेजमध्ये सामील झाले आहेत. त्यात सामील होणारे कामत हे चौथे आणि सर्वात तरुण भारतीय आहेत.
२४० अब्जाधीशांनी दिली देणगी
आता निखिल यांनी सांगितले आहे की, त्यांना बंगळुरूतील उद्योजक नंदन निलेकणी, किरण मजुमदार-शॉ आणि अझीम प्रेमजी यांच्याकडून आपली अर्धी संपत्ती दान करण्याची प्रेरणा मिळाली. हे सर्वजण निखिलच्या आधी बफे-गेट्सच्या द गिव्हिंग प्लेजमध्ये सामील झाले होते. जगभरातील २४० अब्जाधीश द गिव्हिंग प्लेजशी संबंधित आहेत आणि त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग सामाजिक कारणांसाठी समर्पित केला आहे.
अशा प्रकारे दान करण्याची प्रेरणा मिळाली
बंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या NAS समीटमध्ये निखिल सहभागी झाले होते. शिखर परिषदेदरम्यान आपल्या भाषणात त्यांनी मालमत्ता दान करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले. ते म्हणाले की, भारतातून आतापर्यंत चार जण द गिव्हिंग प्लेजमध्ये सामील झाले आहेत. आधी उल्लेख केलेले तिघेही माझे चांगले मित्र आहेत. ते सर्व बंगळुरूचे आहेत. नंदन निलेकणी, किरण मजुमदार आणि अझीम प्रेमजी यांच्याबाबत ते म्हणाले की, तुम्ही मोठे होत असताना तुमच्यावर तीन-चार लोकांचा प्रभाव पडतो. तुम्हाला त्यांच्यासारखे व्हायचे आहे. माझ्या बाबतीतही असेच घडले, असंही निखिल कामत म्हणाले.
कामत यांनी यापूर्वीच देणगी दिली
कामत यांनी मोठी देणगी देण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. Edelgive-Hurun India Philanthropy List २०२२ नुसार, निखिल कामत आणि त्ंयाचा भाऊ नितीन कामत यांनी २०२२ मध्ये त्यांच्या संपत्तीतून १०० कोटी रुपये दान केले. निखिल कामत सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. फोर्ब्सच्या मते, निखिल कामतची सध्याची एकूण संपत्ती सुमारे १ अब्ज डॉलर आहे.