Infosys Layoff Latest News: काही दिवसांपासून इन्फोसिस या प्रथितयश आयटी कंपनीनं तब्बल ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. कंपनीच्या म्हैसूर कॅम्पसमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या या ४०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यामुळे इन्फोसिसवर नेटिझन्सकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या कर्मचारी कपातीसाठी ‘सायलेंट ले ऑफ’ प्रक्रिया Infosys नं राबवल्याचंही बोललं जात आहे. पण कंपनीच्या या निर्णयाचा NITES या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतानाच थेट केंद्र सरकारकडे तक्रार दाखल केली आहे.
NITES ची कामगार मंत्रालयाकडे तक्रार
NITES अर्थात The Nascent Information Technology Empolyees Senate नं इन्फोसिसच्या कर्मचारी कपातीविरोधात केंद्रीय कामगार विभागाला पत्र पाठवून रीतसर तक्रार नोंदवली आहे. इन्फोसिसनं केलेली ही कर्मचारी कपात बेकायदेशीर, अनैतिक आणि कामगार कायद्यांचं उल्लंघन करणारी आहे, असंही संघटनेनं पाठवलेल्या तक्रार पत्रात नमूद करण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांना यासंदर्भात लिहिलेल्या पत्रात NITES चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली आहे. “इन्फोसिसनं कॅम्पसमधून भरती केलेल्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना काही महिन्यांपूर्वीच कंपनीत रुजू करून घेतलं होतं. यासाठीही झालेल्या दोन वर्षांच्या विलंबामुळे त्या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला होता. पण आता कंपनीनं या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याच्या अनेक तक्रारी संबंधित कर्मचाऱ्यांकडून आमच्याकडे दाखल झाल्या आहेत”, असं या पत्रात सलुजा यांनी नमूद केलं आहे.
कर्मचाऱ्यांना परत घेण्याची मागणी
NITES नं कामावरून काढलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांन इन्फोसिसनं परत कामावर रुजू करून घ्यावं, अशी मागणी केली आहे. तसेच, त्यांना झालेल्या मानसिक त्रासासाठी त्यांना नुकसान भरपाईही दिली जावी, असंही पत्रात म्हटलं आहे. कंपनीकडून या कपातीसाठी सलग तीन मूल्यांकन चाचण्यांमध्ये कर्मचारी अपयशी ठरल्याचं कारण दिलं आहे. त्यावरही NITES नं आक्षेप घेतला आहे.
“कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यासाठी कंपनीकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या करण्यात आल्या आहेत. कंपनीकडून तर कर्मचाऱ्यांना काढण्यासाठी बाऊन्सर्स आणि सुरक्षा कर्मचारीही तैनात केले होते, जेणेकरून कर्मचारी या प्रक्रियेदरम्यान मोबाईल सोबत बाळगू शकणार नाहीत आणि घडणाऱ्या घडामोडींचं चित्रीकरण करू शकणार नाहीत”, असंही NITES नं पत्रात म्हटलं आहे. “इन्फोसिस अतिशय भयानक पद्धत कायम करू पाहात आहे”, असंही NITES नं पत्रात म्हटल्याचं टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
काय आहे Infosys चा दावा?
दरम्यान, इन्फोसिसनं या कर्मचारी कपातीमागे रास्त कारण असल्याचा मुद्दा मांडला आहे. “नव्याने रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना अंतर्गत मूल्यांकन चाचणीत यशस्वी होण्यासाठी तीनवेळा संधी दिली जाते. त्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांना संस्थेत काम करता येत नाही, असं त्यांच्या कंत्राटातच नमूद केलं आहे. ही प्रक्रिया जवळपास गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. यातून आमच्या कंपनीत उत्तम कौशल्याचं मनुष्यबळ लोकांना चांगल्या दर्जाची सुविधा देण्यासाठी उपलब्ध असतं”, अशी बाजू इन्फोसिसनं मांडल्याचं टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे.