मुंबईः आरोग्य विमा क्षेत्रातील निवा बूपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे प्राथमिक अर्ज दाखल केला आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीचा ३,००० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा मानस आहे.
निवा बूपाने सेबीकडे सादर केलेल्या मसुदा प्रस्तावानुसार, कंपनी आयपीओच्या माध्यमातून ८०० कोटी रुपयांच्या नवीन समभागांची विक्री करणार आहे. तर विद्यमान प्रवर्तकांच्या मालकीच्या आंशिक समभाग विक्रीतून (ओएफएस) २,२०० कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. आंशिक समभाग विक्रीत गुंतवणणूकदार फेटल टोन कंपनीकडून १,८८० कोटी रुपये मूल्याचे समभाग आणि बूपा सिंगापूर होल्डिंग्ज कंपनीकडून ३२० कोटी रुपये मूल्याच्या समभाग विक्रीचा समावेश असेल. बुपा या आंतरराष्ट्रीय आरोग्य सुविधा कंपनीच्या मालकीची निवा बूपा कंपनी आहे. बूपाचे मुख्यालय ब्रिटनमध्ये आहे. सध्या निवा बूपामध्ये बुपा सिंगापूर होल्डिंग्जचा ६२.२७ टक्के आणि फेटल टोनचा २७.८६ टक्के हिस्सा आहे.