वृत्तसंस्था, ओस्लो : संकटग्रस्त अदानी समूहाच्या अडचणी आणखी वाढताना दिसत असून, गुरुवारी नॉर्वेच्या १.३५ लाख कोटी डॉलरची गंगाजळी असलेल्या सार्वभौम वेल्थ फंडाने अदानी समूहाशी संबंधित कंपन्यांमधील सर्व समभाग विकून एकूण गुंतवणूक आता शून्यावर आणली असल्याचे स्पष्ट केले.
जागतिक स्तरावर गुंतवणूकजगतात अलिकडे ‘ईएसजी’ अर्थात पर्यावरणाप्रती संवेदनशीलता, सामाजिक जबाबदारी व कंपनी प्रशासन या अंगाने चांगली कामगिरी ही गुंतवणुकीसाठी कंपन्यांच्या निवडीचा महत्त्व निकष बनला आहे. नॉर्वे वेल्थ फंडाच्या ‘ईएसजी’ जोखीम विभागाचे प्रमुख क्रिस्टोफर राईट यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, खासकरून पर्यावरणाशीसंबंधित जोखीम हाताळण्याविषयी मुद्दय़ांबाबत अदानी समूहातील कंपन्यांकडून कूचराई झाली असल्याचे कारण दिले आहे.
तथापि नॉर्वे वेल्थ फंडाचा गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा हा निर्णय, आजवरच्या सर्वात वाईट काळ आणि समभाग मूल्यात लक्षणीय ऱ्हास अनुभवत असलेल्या अदानी समूहावर येऊन कोसळला आहे. न्यूयॉर्कस्थित ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या संशोधन अहवालातील विविध प्रकारच्या अनियमितता आणि लबाडय़ांच्या आरोपांनी अदानी समूहातील सर्वच कंपन्यांच्या समभागांत मोठी वाताहत सुरू आहे. परिणामी, बुधवारी टोटल एनर्जीज् या फ्रेंच कंपनीने अदानींबरोबरची भागीदारी तूर्त स्थगित करीत असल्याचे जाहीर केले, तर जागतिक पातळीवरील काही कंपन्यांनी अदानी समूहातील गुंतवणुकीबाबत पुनर्विचार सुरू केला आहे.
अनेक वर्षांपासून अदानी समूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक असणाऱ्या नॉर्वे वेल्थ फंडाने सर्वप्रथम २०१४ पासून अदानी समूहातील पाच कंपन्यांमधून निर्गुतवणुकीला सुरुवात केली. तर २०२२ अखेपर्यंत त्यांची अदानी पोर्ट्ससह तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक होती. मात्र सरलेल्या वर्षांअखेरपासून अदानी समूहातील कंपन्यांमधील समभाग विक्रीला त्यांनी पुन्हा सुरुवात केली. आता मात्र अदानी समूहातील कंपन्यांमध्ये कोणतीही गुंतवणूक नाही, असेही क्रिस्टोफर राईट यांनी सांगितले. वर्ष २०२२ च्या अखेरीस, नॉर्वेच्या वेल्थ फंडाकडे अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ४३५ कोटी रुपये मूल्याचे, तर अदानी टोटल गॅसमध्ये ६९० कोटी रुपये मूल्याचे आणि अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये ५२० कोटी रुपये मूल्याचे समभाग होते.
अदानींच्या समभागातील घसरण थांबेना
संकटग्रस्त अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण कळा कायम आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या समभागात गुरुवारच्या सत्रात ११.०२ टक्क्यांची घसरण झाली. तर अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवरमध्ये प्रत्येकी ५ टक्क्यांची आणि अदानी पोर्टची २.८३ टक्क्यांची घसरण झाली. मात्र अदानी विल्मरचा समभाग ४.९९ टक्क्यांनी वधारून बंद झाला.