प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची वेळ आता जवळ येत आहे. आपण नेहमीच कोणत्या व्यावसायिकाने किंवा कोणत्या अभिनेत्याने सर्वाधिक कर भरलाय याचीच चर्चा करीत असतो. खरं तर चित्रपटांमधून कमाई करण्याव्यतिरिक्त बॉलिवूड कलाकार आणि अभिनेत्री इतर अनेक व्यवसायदेखील करीत असतात. या कारणास्तव त्यांची एकूण संपत्ती कोटींमध्ये असते आणि देशातील सर्वाधिक करदात्यांच्या श्रेणीमध्ये त्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे कर योगदानामध्ये कलाकारांचे वर्चस्व असते. अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या दरवर्षी करोडो रुपये कमावतात. ज्यामध्ये कतरिना, आलिया भट्ट, करिना कपूर, प्रियंका चोप्रा अशा अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. परंतु त्यातही अशीही एक अभिनेत्री आहे, जी इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त टॅक्स भरते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात १० कोटी रुपयांचा कर भरण्यात आला होता. त्यानंतरच्या वर्षांमध्येही तेवढ्याच रकमेचा कर भरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
२०१९ मध्ये ४८ कोटींची कमाई
गेल्या वर्षी सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या यादीत दीपिका पदुकोण ही एकमेव अभिनेत्री होती. फोर्ब्स इंडियाच्या मते, दीपिकाच्या कमाईचा मुख्य स्त्रोत जाहिराती आहे. २०१९ मध्ये तिने पद्मावतमध्ये ४८ कोटी कमावले होते, ज्यासाठी तिला १२ कोटी रुपये मानधनाच्या स्वरूपात देण्यात आले होते. त्या वर्षी तिने रोहित शर्मा, अजय देवगण आणि रजनीकांत यांसारख्या सेलिब्रिटींना मागे टाकत सर्वोच्च १० भारतीय सेलिब्रिटींमध्ये प्रवेश मिळवला.
हेही वाचाः सुधा व नारायण मूर्ती तिरुपतीच्या दर्शनाला, सोन्याचा शंख अन् कासव दान, ‘या’ वस्तूंचं महत्त्व काय?
आलिया भट्ट ५ ते ६ कोटींचा कर भरते
इतर अभिनेत्रींच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अद्याप कोणीही १० कोटी रुपये कराच्या आकड्याजवळ पोहोचलेले नाही, आलिया भट्टने या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे, ती वार्षिक सुमारे ५ ते ६ कोटी रुपये कर भरते. यापूर्वी सर्वाधिक कर भरणारी अभिनेत्री कतरिना कैफ होती, जिने २०१३-२०१४ या आर्थिक वर्षात ५ कोटींहून अधिक कर भरला होता. रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोणने अलीकडील प्रोजेक्टमध्ये यश मिळवल्यानंतर तिच्या व्यवसायाचा विस्तार केला. त्यामुळेच तिची कमाई वाढली.
हेही वाचाः Money Mantra : तुम्ही चुकीच्या UPI पत्त्यावर पैसे पाठवलेत का? परत मिळवण्यासाठी काय कराल?
प्रियंका चोप्राकडे सर्वाधिक संपत्ती
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोणची एकूण संपत्ती ५०० कोटी रुपये आहे. ६२० कोटी रुपयांच्या संपत्तीसह महिला भारतीय सेलिब्रिटींमध्ये प्रियंका चोप्रा जोनासनंतर ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. सुमारे ४८५ कोटी रुपयांची संपत्ती असलेली करिना कपूर खान देशातील सर्वात श्रीमंत महिला सेलिब्रिटींपैकी एक आहे.