मुंबई : मध्यवर्ती बँकेने गेल्या अनेक वर्षांपासून विनिमय दर धोरणांत सातत्य राखले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कोणतीही एका विशिष्ट पातळीसाठी रिझर्व्ह बँकेने थेट हस्तक्षेप केलेला नाही. सध्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ८७.५९ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर घसरला असून, या दृष्टीने मोठा ताण नसल्याचेच गव्हर्नरांनी सूचित केले. गुरुवारच्या सत्रात, डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांनी घसरून ८७.५९ या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला.
रिझर्व्ह बँकेचे विनिमय दर धोरण सातत्यपूर्ण राहिले असून बाजार कार्यक्षमतेशी कोणतीही तडजोड न करता, विनिमय दरात स्थिरता राखणे हे मध्यवर्ती बँकेचे उद्दिष्ट आहे. परकीय चलन बाजारातील हस्तक्षेप हा रुपयाच्या ठरावीक पातळीला लक्ष्य करण्यासाठी नव्हे, तर अस्थिरता कमी करण्यासाठी असतो. परदेशी चलनाच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर बाजार शक्तींद्वारे निश्चित केला जातो. विद्यमान २०२५ मध्ये वर्षारंभापासून आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपया सुमारे २ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्यावर्षी ६ नोव्हेंबरला, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, त्या दिवसापासून डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ३.२ टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. त्याच कालावधीत डॉलर निर्देशांकात २.४ टक्के वाढ झाली आहे.
बाजारातील रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे गेल्या तीन महिन्यांत परकीय चलन साठ्यात ४५ अब्ज डॉलरची घट झाली आहे. गव्हर्नर मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ३१ जानेवारी २०२५ रोजी, भारताचा परकीय चलन साठा ६३०.६ अब्ज डॉलरवर आहे. जो १० महिन्यांहून अधिक कालावधीच्या आयातीला पुरेल इतका आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या व्याजदर कपातीमुळे, अमेरिकी डॉलर मजबूत झाला आणि रोखे उत्पन्नवरील परतावा दर देखील उच्चांकी गेला आहे, असे ते म्हणाले. उभरत्या अर्थव्यवस्थांमधून मोठ्या प्रमाणात परकीय निधीचे निर्गमन झाल्यामुळे त्यांच्या चलनांचे तीव्र अवमूल्यन झाले असून विकासदर देखील मंदावला आहे.