अयोध्येबाबत रोज नवनवीन बातम्या येत आहेत. २२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार असून, त्याची तयारीही जोरदारपणे सुरू आहे. देशातच नाही तर परदेशातही श्रीरामाचा जयघोष होत आहे. अयोध्येतील मंदिरात बसलेले रामलल्ला स्वतःच्या डोळ्यांनी पाहावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. दरम्यान, छत्तीसगड सरकारने अयोध्येला जाणाऱ्यांसाठी मोफत ट्रेनची घोषणा केली आहे.
छत्तीसगडमधील भाजप सरकारने अयोध्या मंदिरात प्रभू रामाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी वार्षिक मोफत रेल्वे प्रवास योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मोफत ट्रेनचा निर्णय म्हणजे पंतप्रधानांच्या आणखी एका हमीची पूर्तता असल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्रेनच्या मदतीने २० हजारांहून अधिक भाविक अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घेऊ शकतील.
कोण पात्र असतील?
१८ ते ७५ वयोगटातील लोक जे वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त आहेत, ते या योजनेसाठी पात्र असतील. पहिल्या टप्प्यात ५५ वर्षांवरील व्यक्तींची निवड केली जाणार आहे. यात्रेकरूंच्या निवडीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही योजना छत्तीसगड पर्यटन मंडळाद्वारे चालविली जाणार आहे आणि राज्य पर्यटन विभाग त्याचे आवश्यक बजेट प्रदान करेल. या रेल्वे प्रवासादरम्यान लोकांच्या खाण्यापिण्याची काळजी आयआरसीटीसी घेणार आहे. रायपूर, दुर्ग, रायगड आणि अंबिकापूर स्थानकांवरून लोक या ट्रेनमध्ये चढू शकणार आहेत.
छत्तीसगड सरकारचा मोठा निर्णय
छत्तीसगड ते अयोध्या हा प्रवास सुमारे ९०० किमीचा असेल, ज्यामध्ये शेवटचे स्टेशन अयोध्या असेल. यात्रेकरू वाराणसीमध्ये रात्रभर विश्रांती घेऊ शकतील, जिथे त्यांना काशी विश्वनाथ मंदिरात नेले जाणार आहे आणि गंगा आरतीमध्ये भागसुद्धा घेता येणार आहे. छत्तीसगड सरकारचा हा निर्णय मोठा मानला जात आहे. नुकताच विष्णू सरकारने छत्तीसगडमध्ये २२ जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे.