नवी दिल्ली : नव्या युगाची रोकडरहित देयक व्यवहारांचा आधुनिक पर्याय असलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात यूपीआयसारखी प्रणाली विकसित करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्रालयासोबत करार केला आहे. त्या देशात अशी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआयच्या परदेशातील कंपनीला काम सोपवण्यात आले आहे.

भारताच्या यूपीआय तंत्रज्ञानाचा आणि अनुभवांचा फायदा त्रिनिदाद आणि टोबॅगोला त्याच्या आर्थिक परिसंस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी करून देण्याचा हा प्रयत्न आहे. यूपीआय प्रणालीचा स्वीकार करणारे हे पहिले कॅरिबियन राष्ट्र आहे. यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय देयक तंत्र-जाळ्यासह सुलभ, परवडणारी प्रणाली सुरू करणे समाविष्ट आहे. एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने तेथील डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्रालयासोबत हा करार केला आहे. या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट कॅरिबियन राष्ट्रांमध्ये डिजिटल वित्तीय सेवा वाढवणे आणि रिअल-टाइम पर्सन-टू-पर्सन (पीटूपी) आणि व्यापारी देयक व्यवहार (पीटूएम) वाढविणे हे आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये त्यांच्या नागरिकांच्या डिजिटल कल्याणासाठी समान व्यासपीठ तयार करणे शक्य होणार आहे.देशांतर्गत आघाडीवर, ऑगस्ट २०२४ मध्ये, २४५ अब्ज डॉलर मूल्यासह सुमारे १५ अब्ज यूपीआय व्यवहारांची नोंदणी केली आहे.