पीटीआय, नवी दिल्ली
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (एनपीसीआय) आंतरराष्ट्रीय उपकंपनी एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्सकडून ‘अल एतिहाद पेमेंट्स’शी आबू धाबीमध्ये करार केला जाणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) भारताच्या रुपे डेबिट कार्डसारखे देशांतर्गत कार्ड विकसित करण्यासाठी हा परस्पर सामंजस्य करार केला जाणार आहे.
केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल हे ५ व ६ ऑक्टोबरला आबू धाबीच्या दौऱ्यावर आहेत. उद्योजकांचे शिष्टमंडळ घेऊन गोयल तिथे पोहोचणार आहेत. या दौऱ्यात या संबंधाने उभय कंपन्यांत सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणार आहे. भारत-संयुक्त अरब अमिराती गुंतवणूकविषयक उच्चस्तरीय कृती गटाची अकराव्या बैठकीचे गोयल हे सहअध्यक्ष असणार आहेत. आबू धाबी गुंतवणूक मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमीद बीन झायेद अल नहयान हेही बैठकीचे सहअध्यक्ष असतील.
एनपीसीआयकडून सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तार केला जात आहे. ‘यूपीआय’ सेवा देणारी ही संस्था आहे. फ्रान्समधील ऑनलाइन पेमेंट सिस्टीम ‘लायरा’सोबत २०२२ मध्ये एनपीसीआयने सामंजस्य करार केला होता. त्यानंतर सिंगापूरमधील ‘पे नाऊ’सोबत करार केला गेला. त्यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांना या प्रणालींद्वारे व्यवहार करणे शक्य झाले. संयुक्त अरब अमिराती, भूतान आणि नेपाळने याआधीच यूपीआय प्रणालीचा स्वीकार केला आहे. अमेरिका, युरोपीय देश आणि पश्चिम आशियामध्ये विस्तार साधण्याची एनपीसीआय इंटरनॅशनलची योजना आहे.