Share Market Open On Union Budget 2025 Day : नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने १ फ्रेब्रुवारी २०२५ रोजी असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार सुरू राहणार असल्याचे घोषित केले आहे. याबाबत एनएसई ने २३ डिसेंबर रोजी पत्रक जारी केले आहे. या पत्रकामध्ये म्हटले आहे की, “१ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार सुरू राहणार आहे. याचबरोबर ट्रेडिंगही करता येणार आहे.”

दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार खुला ठेवणे नवे नाही. यापूर्वी शनिवार, १ फेब्रुवारी २०२० आणि शनिवार, २८ फ्रेब्रुवारी २०१५ रोजीही शेअर बाजार सुरू ठेवण्यात आला होता. अर्थसंकल्पीय दिवस हा शेअर बाजाराच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. कारण केंद्रीय अर्थसंकल्पादरम्यान केलेल्या घोषणांचा बाजारातील कल आणि गुंतवणूकदारांवर परिणाम होतो. सामान्यपणे शेअर बाजाराचे कामकाज सोमवार ते शुक्रवार असे चालते. पण यंदाही अर्थसंकल्पाच्या दिवशी एनएसई आणि बीएसईने बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कर आकारणी, सरकारी खर्च आणि आर्थिक सुधारणांशी संबंधित निर्णयांचा संपूर्ण अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांवर थेट परिणाम होतो. त्यामुळे बाजारातील अस्थिरता आणि खरेदी-विक्री वाढते. अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार सुरू ठेवल्याने गुंतवणूकदारांना अर्थ मंत्र्यांच्या घोषणेमुळे बाजारावर होणाऱ्या परिणामांना प्रतिसाद देण्यास संधी मिळते.

एक फ्रेब्रुवारीला सुद्धा ट्रेडिंग नियमित होते त्या वेळेतच होणार आहे. बाजाराची प्री-ओपनिंग सकाळी ९ ते ९.०८ या वेळेत होईल, त्यानंतर बाजार सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत चालू राहिल.

हे ही वाचा : क्रेडिट कार्ड बिल वेळेवर न भरल्यास, ३० टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आकारण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत. निर्मला सीतारमण या यंदा सलग आठव्या वेळी केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत. निर्मला सितारामण आणि त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली असून, उद्योग क्षेत्रातील विविध घटकांकडून याबाबत अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत.

१ फेब्रुवारीला निर्मला सीतारामण सकाळी ११ वाजता अर्थसंकल्पीय भाषण करतील. त्यांचे हे भाषण अर्थमंत्रालयाच्या यूट्युब चॅनलवर लाईव्ह पाहता येणार आहे. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या नावावर सर्वात जास्त वेळ अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम आहे. त्यांनी २०२० मध्ये २ तास ४० मिनिटे बोलत अर्थसंकल्प सादर केला होता.

Story img Loader