मुंबई: आघाडीचा बाजारमंच असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात ‘एनएसई’ने २० कोटी ग्राहक संख्येचा टप्पा गाठला आहे. मुख्यतः डिजिटल परिवर्तन, तांत्रिक नवकल्पना यामुळे नोंदणीकृत ग्राहक खात्यांची संख्या वाढल्याचे बुधवारी बाजारमंचाकडून सांगण्यात आले.

वर्ष १९९२ मध्ये स्थापन झालेल्या ‘एनएसई’ने सरलेल्या आठ महिन्यांच्या काळात ३.१ कोटी नवे ग्राहक जोडले आहेत. आठ महिन्यांपूर्वी १६.९ कोटी असलेली ग्राहक संख्या विद्यमान ऑक्टोबर महिन्यात २० कोटींपुढे पोहोचली आहे, असे एनएसईने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ही वाढ भारताच्या विकास गाथेवरील गुंतवणूकदारांचा दृढ विश्वास दर्शवते. मोबाइल ट्रेडिंग ॲपचा व्यापक अवलंब आणि सरकारच्या डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून गुंतवणूकदार जागरूकता वाढल्याने, ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शिवाय आर्थिक समावेशनामुळे या गुंतवणूक प्रकाराचे लोकशाहीकरण झाले असून अगदी लहानश्या म्हणजेच, विशेषत: दुय्यम, तृतीय व चतुर्थ श्रेणीतील शहरांतील गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे, असे ‘एनएसई’चे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन म्हणाले.

हेही वाचा : बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; लाडकी बहिण योजनेसाठी सुरक्षा वाढवण्याचे सरकारचे आश्वासन

भांडवली बाजारात समभाग खरेदी-विक्रीबरोबरच, रोखे बाजार, ईटीएफ, म्युच्युअल फंड, रिट्स आणि इन्व्हिट्ससारख्या इतर गुंतवणूक साधनादेखील ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. भांडवली बाजारात सोपी आणि सुटसुटीत झालेली केवायसी प्रक्रिया, आर्थिक साक्षरता कार्यक्रम आणि भांडवली बाजारातील शाश्वत सकारात्मक भावनेने ग्राहक उत्तरोत्तर आकर्षित होत आहेत.

हेही वाचा : वित्तीय तूट वार्षिक उद्दिष्टाच्या २९.४ टक्क्यांवर; सप्टेंबरअखेरीस ४.७४ लाख कोटींवर

महाराष्ट्र आघाडीवर

देशातील सर्व राज्यांमध्ये, महाराष्ट्र ३.६ कोटी डिमॅट खात्यांसह आघाडीवर आहे, त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश (२.२ कोटी), गुजरात (१.८ कोटी), राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी १.२ कोटी डिमॅट खाती आहेत. एकत्रितपणे, या पाच राज्यांचा एकूण ग्राहक खात्यांमध्ये जवळपास ५० टक्के वाटा आहे, तर पहिल्या दहा राज्यांचा वाटा एकूण गुंतवणूकदारांच्या तुलनेत अंदाजे तीन-चतुर्थांश आहे.

Story img Loader