मुंबईः भांडवली बाजारात समभाग खरेदी-विक्रीची व्यवहारपूर्तता एका दिवसात (सेटलमेंट) पूर्ण करणाऱ्या नव्या ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणालीची अंमलबजावणी राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने पुढे ढकलली आहे. या संबंधाने एनएसईने शुक्रवारी परिपत्रक प्रसिद्ध करून याबाबत घोषणा केली.
येत्या ३० सप्टेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली निवडक कंपन्यांच्या समभागांसाठी सुरू करण्यात येणार होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने तिचा विस्तार केला जाणार होता. ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली पुढे ढकलण्याच्या निर्णयामागील कारण बाजारमंचाने स्पष्ट केलेले नाही. मात्र ‘टी प्लस शून्य’ प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी सुधारित तारीख वेगळ्या परिपत्रकाद्वारे योग्य वेळी जाहीर केली जाईल, असे ‘एनएसई’ने म्हटले आहे.
सध्या भारतीय भांडवली बाजारात सुरू असलेल्या ‘टी प्लस एक’ प्रणालीनुसार समभाग खरेदी आणि विक्रीची नोंद गुंतवणूकदाराच्या डिमॅट खात्यात व्यवहारानंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण होते. त्यामुळे विक्री करणाऱ्यांना दुसऱ्या दिवशी पैसे मिळतात. मात्र ‘टी प्लस शून्य’ या प्रणालीमुळे समभाग विक्री करणाऱ्या ग्राहकांना त्याच दिवशी पैसे मिळणे शक्य होणार आहे. मार्च महिन्यात ‘सेबी’ने ‘टी प्लस शून्य’ प्रणालीच्या प्रयोगरूपातील (बिटा) आवृत्तीला मंजुरी दिली होती.
हेही वाचा >>>Aakriti Chopra Resings Zomato : झोमॅटोच्या सहसंस्थापक आकृती
बदलत्या काळाशी ताळमेळ राखत, भारताच्या समभाग व्यापारासंबंधी पायाभूत सुविधांना जागतिक मानकांच्या पातळीवर आणणारे हे बाजार नियंत्रक ‘सेबी’ने ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणालीला मान्यता दिली आहे. याआधी ‘सेबी’ने भांडवली बाजार आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षणाच्या प्रयत्नात, नियामकांनी व्यवहारपूर्ततेच्या कालावधीत उत्तरोत्तर कपात करत आणली आहे. २००२ मध्ये टी प्लस ५ वरून टी प्लस ३ आणि त्यानंतर २००३ मध्ये टी प्लस २ पर्यंत व्यवहारपूर्ततेचा काळ कमी केला गेला. तर जानेवारी २०२३ पासून पूर्णत्त्वाने लागू झालेल्या टी प्लस १ प्रणालीची अंमलबजावणी २०२१ पासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली.
‘टी प्लस शून्य’ प्रणालीचे फायदे?
‘टी प्लस शून्य’ प्रणालीमुळे व्यवहारपूर्ततेचा कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे खर्च आणि वेळेची कार्यक्षमता अधिक वाढेल. याचबरोबर ही प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. तसेच, हे व्यवहार त्याच दिवशी झाल्याने त्यातील जोखीमही कमी होईल, अशी ‘सेबी’ची भूमिका आहे.