मुंबई : सरकारी मालकीची ‘महारत्न’ दर्जा प्राप्त असलेल्या एनटीपीसीची उपकंपनी ‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी’चा समभागाचे बुधवारी भांडवली बाजारातील सूचिबद्धतेला, आयपीओद्वारे वितरित किमतीच्या तुलनेत ३ टक्के अधिमूल्यासह पदार्पण केले, तर सत्राअखेरपर्यंत १२ टक्के अधिमूल्य कमावत समभाग स्थिरावला.
‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी’च्या समभागाने राष्ट्रीय शेअर बाजारात १११.६० रुपयांच्या किमतीवर व्यवहार सुरू केले. समभाग मिळविण्यास यशस्वी ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्याने दिवसअखेरपर्यंत १२.६४ टक्क्यांचा लाभ दाखविला. सत्रातील व्यवहारात तो १२२.६५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर झेपावला, तर १११.५० रुपये हा त्याचा दिवसातील तळ राहिला. दिवसअखेर समभाग १३.६५ रुपयांनी उंचावत १२१.६५ रुपयांवर स्थिरावला. दिवसअखेर कंपनीचे बाजार भांडवल ६९,५७९ कोटी रुपयांवर पोहोचले.
‘एनटीपीसी ग्रीन एनर्जी’चा आयपीओ १९ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान गुंतवणुकीस खुला होता. यासाठी प्रत्येकी १०२ ते १०८ रुपये किमतीपट्टा निश्चित करण्यात आला होता. अक्षय्य ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचे सध्या देशातील सहा राज्यांमध्ये सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यरत आहेत. २०३२ पर्यंत ६०,००० मेगावॉटच्या हरित विजेच्या स्थापित क्षमतेचे तिचे उद्दिष्ट आहे.