लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील नुवामा वेल्थने (पूर्वाश्रमीच्या एडेल्वाइज फायनान्स) नजीकच्या भविष्याबाबत महत्त्वाकांक्षी नियोजनाची घोषणा करताना, व्यवस्थापनाखाली मालमत्ता पुढील पाच वर्षांत (२०२८ पर्यंत) सध्याच्या पातळीवरून पाच पटीने वाढवून २.५ लाख कोटी रुपयांवर नेण्याचे उद्दिष्ट राखले आहे.
विविधांगी मालमत्ता वर्गात गुंतवणुकीची मुभा, डिजिटल तसेच प्रत्यक्ष मानवी सल्ला व मार्गदर्शनावर बेतलेली संकरित सेवा आणि सानुकूलित उपाययोजना असा ग्राहकांना समृद्ध अनुभव देणाऱ्या नुवामा वेल्थला महानगरांपेक्षा, देशातील द्वितीय व तृतीय क्षेत्रात व्यवसायवाढीची अधिक मोठी संधी दिसून येते. या ठिकाणी ३०० हून अधिक ठिकाणी भौगोलिक विस्तारासह, वाढत्या संधीला हेरण्यासाठी ग्राहक-गुंतवणूकदारांना व्यक्तिगत स्वरूपाची सेवा प्रदान करणाऱ्या संपर्क प्रतिनिधींची (रिलेशनशिप मॅनेजर) संख्याही पुढील तीन वर्षांत सध्याच्या सुमारे हजारांवरून दुप्पट करण्याचे नियोजन आहे, असे नुवामा वेल्थचे अध्यक्ष आणि व्यवसायप्रमुख राहुल जैन यांनी सांगितले. सध्या नुवामाच्या सेवा देशभरात फैलावलेल्या ६९ शाखांमार्फत उपलब्ध आहेत.
जूनपर्यंत विलगीकरण पूर्ण होणे अपेक्षित
एडेल्वाइज फायनान्शिय सर्व्हिसेसमधून संपत्ती व्यवस्थापनाच्या व्यवसायाचे विलगीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर नुवामा वेल्थ या नव्या कंपनीच्या समभागांची भांडवली बाजारात सूचिबद्धता केली जाईल आणि जसे गुणोत्तर ठरेल त्याप्रमाणे एडेल्वाइज फायनान्शियल सर्व्हिसेसच्या भागधारकांना नवीन कंपनीचे समभाग वितरित केले जातील, असे नुवामा वेल्थचे अध्यक्ष राजीव जैन यांनी सांगितले.