वृत्तसंस्था, कॅलिफोर्निया
कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रातील आघाडीची कंपनी एनव्हीडिया बाजार मूल्याच्या बाबतीत जगातील महाकाय कंपन्या ॲपल, मायक्रोसॉफ्टला मागे सारून पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. अमेरिकी भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाल्याने तिचे बाजार भांडवल ३.३४ लाख कोटी डॉलरवर (३.३४ ट्रिलियन डॉलर) झेपावले आहे. मायक्रोसॉफ्टचे बाजार भांडवल ३.३२ ट्रिलियन डॉलर तर ॲपलचे बाजार भांडवल ३.२९ ट्रिलियन डॉलर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उल्लेखनीय म्हणजे एनव्हीडिया, ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल हे फ्रान्स, ब्राझील, इटली आणि कॅनडा देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक आहे. या महाकाय जागतिक विस्तार असलेल्या तिन्ही कंपन्यांमध्ये बाजार भांडवलाच्या निरंतर चढाओढ सुरू आहे. अलीकडच्या काही दिवसांत ॲपलने मायक्रोसॉफ्टला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले होते आता एनव्हिडियाने हिरावून घेतले आहे.

हेही वाचा : व्होडाफोनकडून इंडस टॉवर्समधील १८ टक्के भागभांडवल १५,३०० कोटींना विक्री

समभाग मूल्यात ११ पटीने वाढ

विद्यमान २०२४ मध्ये एनव्हीडियाचे समभाग मूल्य १७३ टक्क्यांनी वधारले आहे, तर ऑक्टोबर २०२२ मधील त्यांच्या नीचांकी पातळीपासून ते सुमारे १,१०० टक्क्यांनी (११ पटीने) वाढले आहेत. मंगळवारच्या सत्रात कंपनीने तिच्या बाजार भांडवलात १०३ अब्ज डॉलरची भर घातल्याने एनव्हिडियाने जागतिक महाकाय कंपन्या ॲपल आणि मायक्रोसॉफ्टला मागे टाकले. केवळ नऊ महिन्यांत कंपनीचे बाजार मूल्य १ ट्रिलियन डॉलरवरून २ ट्रिलियन डॉलर झाले आहे. तर मार्च ते जून या ९६ दिवसांच्या कालावधीत ते ३ ट्रिलियन डॉलरपुढे गेले. बीस्पोक इन्व्हेस्टमेंट ग्रुपच्या म्हणण्यानुसार, मायक्रोसॉफ्टला बाजार भांडवलत १ ट्रिलियन डॉलरची भर घालण्यासाठी ९४५ दिवस आणि ॲपलला १,०४४ दिवस लागले. दुसरीकडे, एकेकाळी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या एक्सॉन मोबिलचे समभाग खनिज तेलाच्या घसरलेल्या किमतींमुळे कमालीचे घसरले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nvidia beats microsoft and apple to become the world s most valuable company print eco news css