पीटीआय, नवी दिल्ली
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग कायम असून, आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीतही विकास दर चांगलाच असेल, असा अंदाज केंद्रीय आर्थिक कामकाज सचिव अजय सेठ यांनी बुधवारी व्यक्त केला.
जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील सकल देशांतर्गत उत्पादनाची (जीडीपी) आकडेवारी गुरुवारी (३० नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. बहुतांश अर्थतज्ज्ञांनी विकास दर ६.७ टक्के ते ७ टक्के यादरम्यान राहण्याचे कयास व्यक्त केले आहेत. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकास दर ७.८ टक्के नोंदविण्यात आला आहे. वाढीचा हा वेग दुसऱ्या तिमाहीत कायम राहील, असे नमूद करीत सेठ म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट ५.९ टक्के आहे. अन्नधान्य अनुदानावर अतिरिक्त निधी खर्च होणार असला तरी हे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे.
हेही वाचा… मुंबई शेअर बाजाराचा ऐतिहासिक टप्पा, बाजार भांडवल ४ लाख कोटी डॉलरपुढे
केंद्र सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट जीडीपीच्या ५.९ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या ६.४ टक्के होती. सरकारने वित्तीय तूट आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत जीडीपीच्या ४.५ टक्क्यांवर आणण्याचे निश्चित केले आहे.