पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पटलावर परिस्थिती बदलल्याने एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ दरम्यान रशियाकडून भारतात होणाऱ्या वस्तू-सेवांच्या आयातीमध्ये तब्बल ३८४ टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रशियाकडून भारताची आयात सुमारे पाचपट वाढून ३७.३१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

वर्ष २०२१-२२ मध्ये, रशिया हा भारताचा १८ वा मोठा आयात भागीदार देश होता. त्यावर्षी रशियाकडून ९.८६ अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तू-सेवांची आयात करण्यात आली होती. मात्र चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांच्या कालावधीत रशिया हा भारताचा चौथा मोठा आयात स्रोत बनला आहे. विद्यमान वर्षातील जानेवारीमध्ये सवलतीच्या दरात रशियातून होणाऱ्या खनिज तेलाची भारतातील आयात आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. सलग चौथ्या महिन्यात पारंपरिक आखाती देशांकडून होणाऱ्या तेल आयातीपेक्षा ती अधिक राहणार आहे.

रशिया-युक्रेन संघर्ष सुरू होण्यापूर्वी रशियातून भारतात आयात होणाऱ्या तेलाचे योगदान एकूण तेल आयातीच्या १ टक्क्यांपेक्षा कमी होते. मात्र तो सरलेल्या जानेवारी महिन्यात १२.७ लाख पिंप प्रतिदिन झाले आहे. भारत हा चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियावर पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादल्यानंतर भारताने या संधीचा फायदा घेत रशियाकडून सवलतीत तेल खरेदी करार केला.

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, विद्यमान आर्थिक वर्षात एप्रिल-जानेवारीदरम्यान चीनमधून आयात सुमारे नऊ टक्क्यांनी वाढून ८३.७६ अब्ज डॉलर झाली आहे. त्याचप्रमाणे, संयुक्त अरब अमिरातीमधून आयात २३.५३ टक्क्यांनी वाढून ४४.३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. या कालावधीत अमेरिकेतून भारताची आयात सुमारे २५ टक्क्यांनी वाढून ४२.९ अब्ज डॉलर झाली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oil imports from russia increased by 384 percent asj
Show comments