नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीकडून विविध विभागात काम करणाऱ्या एकंदर एक हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. तोटा कमी करण्यासाठी पुनर्रचनेचे पाऊल म्हणून ही कपात कंपनीसाठी अपरिहार्य ठरली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ओला इलेक्ट्रिककडून ही पाच महिन्यांत दुसरी कपात ठरणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी ५०० कर्मचाऱ्यांची कपात केली होती. आताच्या टप्प्यात नेमकी किती कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. कंपनीचा प्रवक्ता म्हणाला की, तोटा कमी करणे, नफा वाढविणे आणि ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी आम्ही मनुष्यबळाची पुनर्रचना करीत आहोत. त्यामुळे अनावश्यक ठरणाऱ्या जबाबदाऱ्या व पदे कमी केली जातील.
कंपनीने करपूर्व नफा १० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. याचबरोबर उत्पादन साठा व्यवस्थापनांत सुधारणा करून ग्राहकांना लवकर उत्पादन वितरण करण्याच्या दिशेनेही कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीने देशभरात असलेली गोदामे बंद केली आहे. याऐवजी कंपनी चार हजार वितरकांचे जाळे रचले असून, त्याचा वापर वाहन साठा, सुटे भाग आणि वितरणासाठी केला जाणार आहे. कंपनीने डिसेंबर २०२४ अखेर संपलेल्या तिमाहीत ५६४ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदविला आहे. याच तिमाहीत कंपनीचा महूसल १,०४५ कोटी रुपये आहे.
ओला इलेक्ट्रिकची पाच महिन्यांत दुसरी नोकरकपात; आणखी हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचे नियोजन
ओला इलेक्ट्रिककडून ही पाच महिन्यांत दुसरी कपात ठरणार आहे. कंपनीने गेल्या वर्षी ५०० कर्मचाऱ्यांची कपात केली होती.

First published on: 03-03-2025 at 22:06 IST | © The Indian Express (P) Ltd
TOPICSअर्थसत्ता
मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ola electric implements job cuts to control losses print eco news zws