मुंबई : विद्युत शक्तीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या ओला इलेक्ट्रिकला भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) मंगळवारी मंजुरी दिली. आयपीओच्या माध्यमातून कंपनीचा ७,२५० कोटी रुपयांचा निधी उभारणीचा मानस आहे. लवकरच कंपनीकडून समभाग विक्रीसाठी किंमतपट्टा आणि तारीख जाहीर करण्यात येईल.
हेही वाचा >>> युनायटेड कॉटफॅबचा प्रत्येकी ७० रुपयांनी ‘आयपीओ’ गुरुवारपासून
ओला इलेक्ट्रिकने गेल्या वर्षी २२ डिसेंबर २०२३ रोजी मसुदा प्रस्ताव अर्थात ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ बाजार नियामकाकडे दाखल केला होता. मसुदा प्रस्तावानुसार, ओला इलेक्ट्रिक ५,५०० कोटी रुपयांच्या नवीन समभागांची विक्री करणार आहे. तर प्रवर्तकांकडील १,७५० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची आंशिक विक्री (ओएफएस) या माध्यमातून केली जाणार आहे. विद्यमान भागधारक ‘ओएफएस’च्या माध्यमातून सुमारे ९.५१ कोटी समभाग विकण्याची शक्यता आहे. यामध्ये ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल ४.७३ कोटी समभाग विकतील, तर इतर भागधारकांमध्ये अल्फावेव्ह, अल्पाइन, डीआयजी इन्व्हेस्टमेंट, मॅट्रिक्स आणि इतरदेखील ‘ओएफएस’च्या माध्यमातून सुमारे ४.७८ कोटी समभागांची विक्री करतील. मसुदा प्रस्तावानुसार, आयपीओच्या माध्यमातून मिळालेला निधी भांडवली गुंतवणूक, कर्जाची परतफेड, संशोधन आणि विकासासाठी करण्यात येणार आहे. भांडवली गुंतवणूक म्हणून १,२२६ कोटी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी ८०० कोटी रुपये, तर सर्वाधिक १,६०० कोटी रुपयांचा निधी संशोधन आणि विकासासाठी वापरण्यात येईल. ओला इलेक्ट्रिकने मार्च २०२३ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षात २,७८२ कोटी रुपयांचा एकत्रित महसूल नोंदवला होता. मात्र वाढलेल्या खर्चामुळे कंपनीला १,४७२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. ३० जून २०२३ पर्यंत कंपनीची एकूण संपत्ती २,१११ कोटी रुपयांची होती.