मुंबई : नव्या पिढीला साद घालणाऱ्या दोन नवउद्यमी कंपन्यांच्या समभागांची बाजारात सध्या विरूद्ध अंगाने कामगिरी सुरू आहे. निरंतर शुक्लकाष्ट मागे लागलेल्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या समभाग त्याच्या सार्वकालिक उच्चांकापासून ४६ टक्क्यांच्या घसरणीसह, ऑगस्टमधील सूचिबद्धतेनंतर पहिल्यांदाच १०० रुपयांखाली गडगडला, तर पेटीएमच्या समभागाने मंगळ‌वारच्या सत्रात १५ टक्क्यांहून मोठी आजवरची सर्वोत्तम मुसंडी नोंदवली.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून कारणे दाखवा नोटीस मिळाल्यानंतर ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा समभाग ६ टक्क्यांहून अधिक घसरून ८६ रुपयांच्या पातळीवर मंगळवारी गडगडला. सलग चौथ्या सत्रात समभागाची घसरण वाढतच आली आहे. या आधी ग्राहकांच्या सेवाविषयक वाढत्या तक्रारी आणि त्या संबंधाने समाजमाध्यमावर संस्थापक भाविश अगरवाल यांच्याशी रंगलेल्या वादंगाचा समभाग मूल्यावर नकारात्मक परिणाम दिसून आली. सोमवारी या परिणामी समभाग ८ टक्क्यांनी गडगडला होता. तथापि मंगळवारच्या सत्रात कंपनीच्या खुलाशानंतर समभाग ४.५९ टक्क्यांनी सावरून ९५.४१ रुपयांवर बंद झाला.

हेही वाचा : Gold Silver Rate Today : निवडणूक निकालापूर्वी सोने-चांदीचे दर गडगडले, नेमकं किती रुपयांनी झालं स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील दर

दुसरीकडे, पेटीएम मनी या उपकंपनीने तिच्या व्यासपीठावर फ्युचर्स आणि ऑप्शन्स (बीएसई एफ ॲण्ड ओ) व्यवहार सेवा सुरू केल्याची मंगळवारी घोषणा केली. लागू करांसह, प्रति व्यवहार केवळ २० रुपये शुल्क यासाठी पेटीएम मनीने ठेवले आहे, त्यामुळे देशातील किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुल्या झालेल्या सर्वात किफायतशीर पर्यायांपैकी तो एक बनला आहे. याचे पेटीएमच्या (वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड) समभागांवर मंगळवारी सकारात्मक परिणाम दिसून आले आणि समभाग १५.१५ टक्के उसळीसह ७५०.६० रुपयांवर बंद झाला. चालू वर्षातील फेब्रुवारीमधील ३१० रुपये या नीचांकापासून समभागाने तब्बल १४३.१० टक्के वाढ साधणारी केलेली ही कामगिरी आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर कायद्याच्या पुनरावलोकनासाठी सूचना-हरकती दाखल करण्याचे आवाहन

या वर्षी ऑगस्टमध्ये, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा समभाग ७६ रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला. त्वरीत या किंमतीपेक्षा दुप्पट म्हणजेच १५७.४ रुपयांच्या उच्चांकी समभागाने झेप घेतली. मात्र सार्वकालिक उच्चांकापासून समभाग सध्या ४६ टक्क्यांनी गडगडला आहे.