नवी दिल्ली : विद्युत दुचाकीनिर्मिती क्षेत्रातील ‘ओला इलेक्ट्रिक’ने विविध विभागांतील ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. कर्मचारी पुनर्रचनेचा भाग म्हणून काही कर्मचाऱ्यांची गच्छन्ती करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
विक्रीपश्चात सेवांमधील उणिवांमुळे ग्राहकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे कंपनीला अडचणींचा सामना करावा लागला होता. बरोबरच आर्थिक ताळेबंदाची मजबुतीचेही कंपनीपुढे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर, उत्पन्नांत सुधारणा आणि दीर्घकालीन नफा वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनीने अनावश्यक कर्मचारी कमी करण्याचे पाऊल उचलले आहे. पुनर्रचनेमुळे विविध विभागांतील मनुष्यबळावर परिणाम होणार आहे.
हेही वाचा >>> ‘सेबी’कडून प्रकटन नियमाच्या उल्लंघनाची चौकशी
यापूर्वी ‘ओला इलेक्ट्रिक’ने जुलै आणि सप्टेंबर २०२२ मध्ये अशाच प्रकारच्या पुनर्रचनेमुळे अंदाजे १,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. त्या वेळी कंपनीने वापरलेल्या वाहनांची विक्री, क्लाउड किचन आणि किराणा सामान वितरण व्यवसाय बंद करून, विद्युत वाहन विभागावर लक्ष केंद्रित केले. पुढे सप्टेंबर २०२२ मध्ये, कंपनीने कपातीची दुसऱ्या फेरीत आणखी काहींना नारळ दिला.
हेही वाचा >>> आरोपांमुळे अदानी कंपन्यांवरील विश्वासार्हतेवर परिणाम शक्य : एस ॲण्ड पी
भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या ‘ओला इलेक्ट्रिक’चा तोटा सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत ५ टक्क्यांनी कमी होऊन ४९५ कोटींवर स्थिरावला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ५२४ कोटी रुपये होता. तर महसूल ३८.५ टक्क्यांनी म्हणजेच ८९६ कोटींवरून वाढून १,२४० कोटींवर पोहोचला आहे. शुक्रवारच्या सत्रात ‘ओला इलेक्ट्रिक’चा समभाग १.९३ टक्क्यांनी वधारून ६९.१४ रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या समभागांच्या बाजारभावानुसार, तिचे ३०,४९६ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.
तक्रारींचा पाऊस
महिन्याच्या सुरुवातीला, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण अर्थात ‘सीसीपीए’ने ओला इलेक्ट्रिकने उत्पादित केलेल्या दुचाकी आणि विक्रीपश्चात सेवांसंबंधित उणिवा आणि तक्रारींची तपशीलवार चौकशी करण्याचे आदेश दिले. दाखल झालेल्या १०,६४४ तक्रारींपैकी ९९.१ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.