लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : विद्युत शक्तीवरील दुचाकी अर्थात ई-स्कूटरच्या देशातील ३५ टक्के बाजारपेठेवर वर्चस्व गाजवणाऱ्या ओला इलेक्ट्रिकच्या बहुप्रतीक्षित प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) येत्या आठवड्यात २ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्रत्येकी ७२ ते ७६ रुपये किमतीला या समभागांसाठी ६ ऑगस्ट या अंतिम दिवसांपर्यंत बोली लावता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्राच्या हरित, स्वच्छ ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही ईव्ही निर्मात्याकडून भारतात दाखल झालेला हा पहिलाच ‘आयपीओ’ आहे. जपानच्या सॉफ्टबँक समर्थित ओला इलेक्ट्रिकचे मूल्यांकन पूर्वानुमानित ५ अब्ज डॉलरच्या तुलनेत २५ टक्क्यांनी कमी करून ४ अब्ज डॉलरपर्यंत कमी निर्धारित केले जाणे हे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने लक्षणीय ठरेल. कंपनीला या माध्यमातून सुमारे ६,१०० कोटी रुपयांचा निधी उभारला जाणे अपेक्षित आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे प्रवर्तक आणि प्रवर्तक गटांकडून विक्री होणाऱ्या समभागांचे प्रमाणही घटले असून, नव्याने समभाग जारी करून उभारल्या जाणाऱ्या निधीचे प्रमाण एकूण आयपीओमध्ये ५,५०० कोटी रुपये आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये किमान १९७ समभागांसाठी आणि त्यानंतर १९७ च्या पटीत अर्ज करावा लागेल.

हेही वाचा >>>Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहून महिला आनंदित! १० ग्रॅमचा भाव ऐकून बाजारात उसळली गर्दी

ई-दुचाकी निर्मिती आणि त्यासाठी आवश्यक बॅटरी संचाच्या निर्मितीत कार्यरत, ओलाच्या व्यवसाय प्रारूपामध्ये संशोधन व विकास तसेच टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मचाही लक्षणीय समावेश आहे. ज्यामध्ये निरंतर विकसित होत असलेले ई-व्ही तंत्रज्ञान आणि पूरक घटकांचे स्वरूप आणि विकासाशी जुळवून घेता येणारे उत्पादन समाविष्ट आहे. शिवाय पुरवठा साखळी, चार्जिंग सुविधांवर, थेट वितरण व विक्री आणि विक्रीपश्चात सेवा जाळ्यावर कंपनीने मोठी गुंतवणूक केली आहे.

आयपीओतून मिळणाऱ्या ५,५०० कोटींपैकी ओला सेल टेक्नॉलॉजीज या बॅटरी निर्मात्या उपकंपनीवरील भांडवली खर्चापोटी १,२२७ कोटी रुपये, ८०० कोटी रुपये हे कर्जाच्या आंशिक अथवा पूर्णत्वाने परतफेडीसाठी, १,६०० कोटी रुपये संशोधन व विकास उपक्रमांसाठी तर ३५० कोटी अन्य वाढीच्या योजनांवर खर्च केले जाणार आहेत.

नवीनतम-ऊर्जा क्षेत्रातील अग्रणी बनण्याचे लक्ष्य

सरकारच्या उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेनुसार, ई-व्ही निर्मिती आणि बॅटरी सेल निर्मिती अशा दोन्हींमध्ये सर्वात आधी उत्पादन सुविधा कार्यान्वित आघाडी ओला इलेक्ट्रिकने मिळविलीच आहे, पुढे जाऊन नव-अक्षय्य ऊर्जेच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून नावलौकिक स्थापित करण्याचे लक्ष्य आहे, असे ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक तसेच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भाविश अगरवाल यांनी स्पष्ट केले. त्यासाठी नव-तंत्रज्ञानाचा ध्यास आणि संशोधन व विकासावर कंपनीचा भर आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ola electric to raise 6100 crore through ipo print eco news amy