मुंबई: सोन्याच्या भावात सातत्याने वाढ सुरू असल्याने ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी हात आखडता घेतल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धनत्रयोदशीच्या व्यवसायात ५ टक्के घट होण्याची शक्यता ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने व्यक्त केली आहे.
धनत्रयोदशी हा सोन्याच्या खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर नागरिकांकडून सोन्याची खरेदी केली जाते. यंदा दुपारपर्यंत सराफी पेढ्यांमध्ये ग्राहकांची फारशी गर्दी दिसून आली नाही. सायंकाळनंतर ग्राहकांची वर्दळ वाढताना दिसून आली. यंदा धनत्रयोदशीला गेल्या वर्षीएवढीच २० टन सोन्याची विक्री अपेक्षित आहे. मात्र, जास्त भावामुळे सोन्याच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष संयम मेहरा यांनी दिली.
मुंबईतील जव्हेरी बाजारात मंगळवारी प्रति १० ग्रॅमला ७८,७४५ रुपयांवर सोन्याचे घाऊक व्यवहार सुरू होते. याचवेळी चांदीचे व्यवहार प्रतिकिलो ९७,८७३ रुपयांच्या भावावर राहिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. याचवेळी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ८१ हजार ५०० रुपयांवर होता. दिल्लीत चांदीचा भाव प्रतिकिलो ९९ हजार ५०० रुपये होता.
हेही वाचा : कॅनरा रोबेको एएमसीच्या ‘आयपीओ’ला पंधरवड्यात सरकारची मान्यता अपेक्षित
भाव जास्त असल्याने विक्रीत वार्षिक तुलनेत १२ ते १५ टक्के घट यंदाच्या धनत्रयोदशीला दिसून येऊ शकेल, असे सेन्को गोल्ड अँड डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौवांकर सेन म्हणाले, मात्र, भावातील फरकामुळे एकंदर उलाढाल आणि व्यवसायात १० ते १२ टक्के वाढ होण्याचा त्यांचा अंदाज आहे. ग्राहकांकडून कमी वजनाच्या दागिन्यांना मागणी जास्त आहे. विशेषत: नोकरदार महिलांकडून ही मागणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यंदा धनत्रयोदशीला सराफी पेढ्यांमध्ये सकाळपासून ग्राहकांची अपेक्षित गर्दी नव्हती. मुहूर्त सायंकाळपासूनचा असल्यामुळे आज उशिरा आणि उद्याही सकाळी गर्दी दिसून येईल. आगामी सणासुदीच्या काळाचा विचार करून ग्राहकांकडून दागिने खरेदी केली जात आहे. नेकलेस सेट, बांगड्या, ब्रेसलेट आणि चांदीच्या वस्तूंना मागणी अधिक आहे. – सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स
हेही वाचा : युरोपीय महासंघ-भारतादरम्यान मुक्त व्यापार करारासाठी उत्सुक, स्पेनच्या अध्यक्षांचे मुंबई दौऱ्यात प्रतिपादन
भाव वाढले तरी सोन्यावरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर घटल्याने सणासुदीच्या खरेदीत वाढ निश्चितच दिसत आहे. विशेषत: आमच्या २४ कॅरेटच्या ९९.९९ टक्के शुद्धतेच्या प्रमाणित सुवर्ण उत्पादनांना खरेदीत प्राधान्य दिसून येते. आगामी लग्नसराईतही मागणीतील ही सकारात्मक कायम राहण्याची अपेक्षा आहे. – विकास सिंग, व्यवस्थापकीय संचालक व सीईओ, एमएमटीसी-पॅम्प