लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : पारंपरिक खरेदीच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने पुन्हा एकदा वधारूनही, शुक्रवारी खरेदीदारांनी सकाळपासूनच गर्दी केली. वार्षिक तुलनेत सोन्याचा दर १३ हजार रुपयांनी वाढूनही मागणीही जवळपास १० ते १५ टक्क्यांनी अधिक राहिल्याचा सराफ बाजारात प्रमुख पेढ्यांनी दावा केला.
जागतिक कल आणि मजबूत देशांतर्गत मागणीच्या जोरावर शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबईत दहा ग्रॅम सोन्याच्या दराने १,५०६ रुपयांची उसळी घेत ७३,००८ रुपयांचा टप्पा गाठला. चांदीचा भावही २,३०० रुपयांनी वाढून ८५,५०० रुपये प्रति किलो झाला. गेल्यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दहाग्रॅम सोन्याच्या दर ५९,८४५ रुपयांवर होते. म्हणजेच वर्षभरात सोन्याचे दर तोळ्यामागे १३,१६३ रुपयांनी वधारले आहेत.
ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (सीजेसी) अध्यक्ष संयम मेहरा यांच्या मते, लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याच्या अपेक्षेने ग्राहकांनी सोने खरेदीसाठी रांगा लावल्या. हलक्या वजनाच्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी होती. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी किमतीत वाढ झाल्यामुळे सोन्याच्या खरेदीत ५ ते १० टक्के घट होण्याची अपेक्षा होती. मात्र ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली आणि मागणीत प्रत्यक्षात वाढली. अक्षय्य तृतीयेच्या केवळ एका दिवसात देशभरात सुमारे २० ते २२ टन सोन्याची विक्री झाल्याचे नमूद करीत, दक्षिणेत सर्वाधिक ३० ते ४० टक्के विक्री झाल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा >>>इक्विटी फंडातील ओघ एप्रिलमध्ये चार महिन्यांतील नीचांकी; ‘एसआयपी’द्वारे गुंतवणूक वाढत जात एप्रिलमध्ये २० हजार कोटींवर
अक्षय्य तृतीतेचा मुहूर्त साधण्यासाठी १० दिवस आधीपासून ग्राहक सोने खरेदी नोंदवत असतात. त्यामुळे शुक्रवारच्या खरेदीबरोबरीनेच, शनिवारी व रविवारीही खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळेल. जडशीळ दागिने आणि नाण्यांना मागणी कायम आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांना आश्चर्यकारकपणे खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूणच यंदाच्या अक्षय्य तृतीयेला अपेक्षेनुसार विक्री अनुभवास येत आहे, असे पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले.
अलीकडेच सोने खरेदीसाठी शिस्तबद्ध गुंतवणूक पर्याय असणाऱ्या एसआयपीचा मार्ग निवडला जातो आहे. यामुळे गुंतवणूकदार ठराविक कालावधीने नियमितपणे सोने खरेदी करत आहेत. गेल्या अक्षय्य तृतीयेपासून आजपर्यंत सोन्याच्या किमतीत २५ टक्के वाढ झाल्यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत ग्राहकांकडून सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते आहे, असे मत सीजेसीचे उपाध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केले.